

तळा : यावर्षी पावसाळा सुरूवात मे महिन्यात झाली यामुळे धुळवड वाफे करता आले नाही त्यामुळे रूहो करून पेरणी करण्यात आली व लावणी झाली. या बदलणार्या वातावरणाचा सामना करत शेतकरी वर्गाने विविध पध्दतीने लावणी करून आता भाताचे पिक चांगले होत असतानाच तळा तालुक्यातील मागील दोन तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने भातशेतीचे नुकसान झाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.
अनेक ठिकाणी तालुक्यात भातशेती आडवी झाली आहे. ज्या भात शेतीचे नुकसान झाले आहे त्या शेतकर्यांच्या शेतीचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी अपेक्षा केली जात आहे. आता राहीलेली भातशेतील भात घरी येईल का असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. पडणारा परतीचा पाऊस आता कमी व्हावा अशी अपेक्षा निसर्गाकडे शेतकरी वर्ग करत आहे.
तालुक्यात अधिक प्रमाणात वरकस जमीन असून या जमिनीतून फक्त खरीप हंगामात पडणार्या पावसावर भातशेतीचे पिक काढले जाते व या पडणार्या पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतकर्यांना आधार वाटत आहे, आणि आता हा पाऊस असाच कमी कमी होत जावा अशी ईश्वराला प्रार्थना करत आहे. तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.
अद्यापही पावसाचा जोर कमी झालेला नाही. त्यामुळे आगामी काही दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पावसाचा येणार्या रब्बी हंगाम व बागायती शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.