

मिरा भाईंदर : मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय हद्दीत अमली पदार्थ विरोधी कक्ष-1, गुन्हे शाखा यांनी एनडीपीएस कायद्याअंतर्गत विविध ठिकाणी कारवाई केली होती. या कारवाईमध्ये 27 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच या गुन्ह्यात पावने तीस कोटींचे वेगवेगळे अमली पदार्थ जप्त केले होते. हे जप्त केलेले अमली पदार्थ मंगळवारी नष्ट करण्यात आले.
गेल्या काही दिवसापासून मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय हद्दीत विविध ठिकाणी अमली पदार्थांची तस्करी करणार्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत जप्त केलेले अमली पदार्थ नाश करण्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, महाराष्ट्र , पुणे यांनी आदेश दिलेले आहेत. त्यानुसार 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील एनडीपीएस कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त अमली पदार्थ नाश करण्याची मोहीम राबवण्यात आली.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय, अमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीचे मार्गदर्शनाखाली एनडीपीएस कायद्याअंतर्गत 27 गुन्ह्यांमधील जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये गांजा, चरस, मॅफेड्रॉन, हेरॉईन, इफेड्रीन, कोकेन, कफ सिरफ बॉटल्स, अल्पाझोलम टॅब्लेट, ट्रामाडोल टॅब्लेट अशा 240 किलो 420 ग्रॅम वजनाचा 29,76,46,450 रुपये किमतीचा अमली पदार्थांचा मुद्देमाल मंगळवारी तळोजा, पनवेलच्या कंपनीमध्ये नष्ट करण्यात आला आहे.