

Khadipatta Raigad Road Issues
नाते: महाड शहरासह तालुक्यात आज (दि.१४) दुपारनंतर झालेल्या वादळी वाऱ्यासह वळीव पावसामुळे सर्वांची तारांबळ उडवली. खाडीपट्टा व किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मार्गाची पूर्णपणे दुर्दशा झाली. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला.
दरम्यान किल्ले रायगड कडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भात स्थानिक नागरिकांनी दिलेल्या आंदोलनावेळी बारा दिवसांपूर्वी संबंधित ठेकेदाराने १५ मे च्या आधी ही कामे पूर्ण होतील, अशे आश्वासन दिले होते. मात्र, रस्त्याची सध्याची स्थिती पाहता या मार्गाचे काम येत्या ३० तारखेपर्यंत देखील पूर्ण होणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे.
महाड तालुक्यातील किल्ले रायगड मार्गावरील तसेच खाडीपट्टा विभागातील रस्त्याचे काम अक्षय कन्स्ट्रक्शन या एकाच ठेकेदार कंपनीने घेतले आहे. या दोन्ही ठिकाणी नागरिकांच्या गेल्या दोन वर्षापासूनच्या तक्रारींची कोणतीही दखल या ठेकेदाराने घेतली नसल्याचे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे देखील या दोन्ही विभागातील नागरिकांनी केलेल्या तक्रारी संदर्भात संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार या ठेकेदाराला दिलेली कामाची मुदत संपत आली असल्याचे समजते. यामुळे आगामी पावसाळा लक्षात घेता रायगड मार्गावरील अर्धवट अवस्थेत असलेल्या दोन पुलांची कामे तसेच खाडीपट्टा विभागातील रावढळ येथील पुलाचे काम सुरू झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे.
किल्ले रायगड मार्गावरील लाडवली येथील सध्या अर्धवट अवस्थेत असलेल्या पुलाच्या कामाकरता मागील पावसाळ्यापूर्वी नागरिकांनी मोठे आंदोलन केले होते. मात्र, त्यानंतरच्या वर्षभराच्या काळात या ठेकेदाराकडून कामे झाली नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. यामुळे अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीवर महाराष्ट्र शासनाने आता कायदेशीर कारवाई करून त्याला दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.