

Raigad Fort road construction delay
नाते : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड कडील मार्गाच्या कामा संदर्भात आज लाडवली ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी बोलून धारेवर धरले.
याप्रसंगी संबंधित ठेकेदाराकडून 15 मे पूर्वी कामे पूर्ण केली जातील असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र ही कामे पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून संबंधित ठेकेदाराला रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा दिला आहे.
मागील चार वर्षापासून किल्ले रायगड कडे जाणाऱ्या महामार्गाचे काम अत्यंत पूर्ण गतीने संबंधित ठेकेदाराकडून केले जात आहे. याच्या विरोधात स्थानिक नागरिकांकडून अनेक वेळा आंदोलने व शासनाकडे याबाबतच्या विनंत्या अर्ज करून देखील ठेकेदारांकडून पावसाळा सुरू होण्यासाठी तीन ते चार आठवडे बाकी असताना कामे पूर्ण झाली नसल्याबद्दल लाडवली ग्रामस्थांनी आज राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी बोलवून कामाच्या हलगर्जीपणा व ठेकेदारांकडून केल्या जाणाऱ्या कार्याबाबत रोखठोक विचारणा केली.
राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी अक्षरा जगताप यांनी संबंधित ठेकेदारांना ग्रामस्थांसमोर धारेवर धरून सर्व कामे 15 मे पूर्वी पूर्ण करण्याचे सुचित केले. यावेळी संबंधित ठेकेदारचे अधिकारी राजमाने यांनी ही कामे 15 मे पूर्वी पूर्ण करू असे आश्वासन उपस्थित ग्रामस्थांसमोर दिले.
यावेळी बोलताना स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी निसार ढोकले यांनी 15 मे पूर्वी या परिसरातील कामे पूर्ण न झाल्यास स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून अक्षय कन्स्ट्रक्शनच्या एकाही गाडीला रायगड मार्गावर फिरू देणार नाहीत असा स्पष्ट इशारा दिला आहे.