

रमेश कांबळे
अलिबाग : अलिबाग नगरपरिषदमध्ये महाविकास आघाडीच्या शेकापक्षाच्या अक्षया प्रशांत नाईक निर्विवाद बहुमताने निवडून आल्या आणि शेकापने त्यांचे वर्चस्व कायम राखले असले तरी नगरपालिका निवडणुकीत उमेदवार शोधावा लागणाऱ्या भाजपने देखील यावेळी पालिकेमध्ये एक उमेदवार रूपाने शिरकाव केला आहे हे विसरून चालणार नाही. त्याचवेळी महाविकास आघाडी मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना घटक पक्षाला हलके घेणाऱ्या शेकापक्षाला देखील त्यांच्याच श्रीबाग प्रभागातील बालेकिल्ल्यात दणका मिळाला असून शेकापक्षाचे पालिकेतील दोन सदस्य कमी झाले असल्याचे चित्र अलिबाग नगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर दिसून येत आहे.
नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना झाला. यावेळी आघाडीतील शिवसेना उबाठा गटाने शेका पक्षाकडे दोन जागा मागितल्या होत्या मात्र त्या देण्यास शेका पक्ष तयार झाला नाही त्यामुळे शिवसेना उबाठाने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. यामध्ये ठाकरे गटाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. तसेच महायुती मधील भाजपचे एकमेव अँड.अंकित बंगेरा निवडून आल्याने पालिकेच्या शेकापच्या निरंकुश सत्तेवर नियंत्रण ठेवणारे तीन सदस्य पलिका सभागृहात विरोधी बाकावर दाखल झाले आहेत.
पलिका निवडणुकीत नगरसेवक पदाच्या आघाडीच्या शेकापक्षाला 16, काँग्रेस 1,शिवसेना उबाठा 2 तर भाजपला 1 जागांवर यश मिळाले आहे.सकाळपासून महाविकास आघाडी मधील शेका पक्षाचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर दाखल झाले होते. त्यांच्यामध्ये शेका पक्षाचा नगराध्यक्ष निवडून येणार याचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता तसेच बहुसंख्य उमेदवार शेका पक्षाचे निवडून येतील ही खात्री देखील त्यांना होती. जसा जसा निकाल बाहेर येत राहिला त्याप्रमाणे एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला भंडारा उजळून आपला आनंद व्यक्त केला .