रायगड : अलिबाग एस.टी. बसस्थानकाला समस्यांचा विळखा

स्थानकात गर्दुल्ल्यांचा वावर; नादुरुस्त बसेस; पाच वर्षांपासून रखडले नूतनीकरण
अलिबाग, रायगड
अलिबागमध्ये एसटी स्थानकावर मात्र आजही अनेक सुविधांची वानवा आहे. Pudhari News Network
Published on
Updated on

अलिबाग : सुवर्णा दिवेकर

जिल्ह्याचे मुख्यालय असणार्‍या अलिबागमध्ये एसटी स्थानकावर मात्र आजही अनेक सुविधांची वानवा आहे. नादुरुस्त बस, ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या बसेसच्या अनियमित वेळा, बसबाबत माहिती देण्यास टाळाटाळ, स्थानकाचे रखडलेले नूतनीकरण, अतिक्रमण, स्थानकात गर्दुल्यांची ये- जा अशा अनेक समस्यांनी अलिबागचे एसटी स्थानक ग्रासलेले आहे. अनेक वेळा याबाबत तक्रारी करूनही स्थानकाचा कारभार सुधारण्यात आलेला नाही.

रायगड जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अलिबागमध्ये पर्यटन वाढीला चालना मिळू लागली आहे. त्यामुळे येथे येणार्‍या पर्यटकांना वाहतुकीच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी 60 वर्षे जुन्या एसटी स्थानकाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय 2019 मध्ये एसटी महामंडळाने घेतला. स्थानकातील मातीचे पुणे येथील डिरोक्ट्रीक इंजिनिअरिंग या कंपनीकडून मे 2019 मध्ये परिक्षण करून इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला. तळ मजला व पहिला मजला अशी ही इमारत बांधण्यात येणार आहे. मात्र आज 5 वर्षांनंतरही नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली नाही.

अलिबाग स्थानकातून तालुक्यातील ग्रामीण भागासह मुंबई, ठाणे, विरार, पोलादपूर, पंढरपूर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, शिर्डी अशा अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही सोडल्या जातात. त्याचप्रमाणे पनवेल, पेण, कर्जत, रोहा, उरण अशा लोकल सेवाही सुरू असतात. मात्र या गाड्यांच्या अनियमित वेळांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. त्याचप्रमाणे अनेक वेळा शिवशाही, साध्या गाड्याही रस्त्यातच बंद पडत असल्याने प्रवाशांचा खोळंबा होतो. तालुक्यातील ग्रामीण भागात जाणार्‍या गाड्यांची अवस्था तर आणखीनच बिकट आहे. गेल्या 8 वर्षात नवीन एकही गाडी आलेली नाही. त्यामुळे आहे त्याच गाड्या दुरुस्त करून वापराव्या लागतात. उन्हाळ्याच्या दिवसात अतिशय गरम तर पावसाळ्यात गळणार्‍या बसमधून प्रवास करावा लागतो. याबाबत आगार व्यवस्थापकांकडे विचारणा केली असता उत्तर देण्यात टाळाटाळ करण्यात आली. 60 वर्षे जुन्या अलिबाग एसटी स्थानकाला नवे रूप देण्यासाठी ऑगस्ट 2019 मध्ये मोठ्या थाटामाटात भूमिपूजन सोहळा पार पडला. 18 महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा असताना तीन वर्षे उलटूनही निविदा मंजुरीचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर धूळ खात पडून आहे. या प्रकल्पासाठी सहा कोटी 28 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र 5 वर्षांनंतरही या कामाची सुरुवात झाली नाही.

अलिबाग स्थानकाच्या नूतनीकरणाबाबत वरिष्ठांकडून निर्णय घेण्यात येईल. स्थानकात अनुचित घटना घडू नये यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले असून सुरक्षारक्षकही गस्त घालत असतात.

दीपक घोडे, विभागीय वाहतूक नियंत्रक, रामवाडी-पेण

रात्रीच्या वेळी बस फेर्‍या कमी

सायंकाळी 7 वाजेपर्यंत नियमित असणार्‍या बस फेर्‍या त्यानंतर मात्र कमी होतात. यामुळे महिला प्रवाशांची अडचण होते. अनेकदा महिलांना बाहेरून येणार्‍या बसवर अवलंबून रहावे लागते. या महिलांची संख्या कमी असली तरीही स्वारगेट बसस्थानकात झालेल्या प्रकारानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी सतर्क राहणे गरजेचे आहे. अलिबाग स्थानकात बसच्या वेळा अनियमित असण्याची ओरड गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. यासोबतच अचानक बस फेर्‍या रद्द करत असल्याने प्रश्नाचे मात्र हाल होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news