

अलिबाग : कोकणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याच्या हंगामाची चाहूल नोव्हेंबर महिन्यातच लागली असून, रायगड जिल्ह्यातील अलिबागमधून यंदाच्या हंगामातील पहिला आंबा वाशी येथील आंबा मार्केटमध्ये विक्रीसाठी रवाना झाला आहे.
अलिबागमधील आंबा उत्पादक डॉ. संदेश पाटील यांनी १७ नोव्हेंबर रोजी आपल्या बागेतील आंब्याच्या नऊ पेट्या वाशी येथील घाऊक बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवल्या आहेत. त्यामुळे रायगडच्या आंबा हंगामाची सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अलिबाग तालुक्याला हापूस आंब्याच्या उत्पादनाची समृद्ध परंपरा लाभली आहे. येथील हवामान, जमीन आणि नैसर्गिक परिस्थिती आंबा उत्पादनासाठी पोषक मानली जाते. दरवर्षी आंब्याच्या हंगामाकडे शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांचे लक्ष लागलेले असते.
यंदा नोव्हेंबर महिन्यातच डॉ. संदेश पाटील यांच्या बागेतील आंबा विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवण्यात आल्याने आंबा उत्पादकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आंबाबागायतदार डॉ. पाटील यांनी आपल्या बागेतील आंब्याच्या दोन डझन क्षमतेच्या नऊ पेट्या मार्केटकडे रवाना केल्या. या आंब्याचा बुधवारी, १८ नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे.
यंदा नोव्हेंबर महिन्यातच आमच्या बागेतील आंबा विक्रीसाठी वाशी मार्केटमध्ये पाठवण्याचा योग आला, ही आनंदाची बाब आहे. आंबा उत्पादनासाठी वर्षभर बागेची योग्य निगा, झाडांचे व्यवस्थापन आणि आवश्यक काळजी घ्यावी लागते. अलिबागच्या आंब्याला बाजारपेठेत चांगली मागणी आणि योग्य दर मिळावा, अशी अपेक्षा आहे. यंदाचा आंबा हंगाम समाधानकारक ठरेल, असा विश्वास आहे.
डॉ. संदेश पाटील, आंबा बागायतदार, हाशिवरे