

अलिबाग: जुनी ओळख आणि त्यातून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर अखेर गंभीर गुन्ह्यात झाले आहे. शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून एका विवाहितेवर घरात घुसून मारहाण व विनयभंग केल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील महाजने परिसरात घडली आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार विवाहित महिला आपल्या घरात असताना आरोपी नरेश कांबळे याने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह धरला होता. मात्र महिलेने त्यास स्पष्ट नकार दिल्याने आरोपी तिच्यावर चिडून होता. याच रागातून आरोपीने आपल्या साथीदारांसह महिलेच्या घरात प्रवेश केल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी तिच्या हातातील बांबूची काठी हिसकावून घेऊन तिच्यावर हल्ला करण्यात आला. तसेच तिच्या पतीला वाचवण्यासाठी मध्ये पडल्यावर त्यालाही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेदरम्यान आरोपींनी घरातील वातावरणात दहशत निर्माण करत महिलेचा विनयभंग केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
मारहाणीच्या वेळी महिलेच्या मदतीसाठी आलेल्या इतर कुटुंबीयांनाही आरोपींनी धक्काबुक्की केली. या झटापटीत काहींना दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी पीडित महिलेने रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील मारहाण, घरात घुसखोरी, विनयभंग, धमकी आणि सामूहिक गुन्ह्यासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यात नरेश कांबळे याच्यासह पूजा कांबळे, नमदेव जाधव, संतोष जाधव, शुभम जाधव आणि मुंद्या जाधव यांचा समावेश असून सर्व आरोपी महाजन परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.