Raigad Fort Restoration: रायगडावर बसविल्या शिवकालीन १८ पायऱ्या

प्राधिकरण तज्ज्ञ समितीच्या शिफारसीची अंमलबजावणी
Raigad Fort Restoration
Raigad Fort RestorationPudhari
Published on
Updated on

इलियास ढोकले

नाते: दुर्गराज रायगडाच्या पायरी मार्गावरील शिवकालीन ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने रायगड विकास प्राधिकरणाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तिथीनुसार होणारा राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर हत्ती तलाव मार्गावरील नव्याने बसविण्यात आलेल्या पायऱ्या हटवून शिवकालीन मूळ घडीव पायऱ्या पुन्हा खुल्या करण्यात येणार आहेत.

यासंदर्भातील माहिती रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यावरून दिली आहे.

Raigad Fort Restoration
Poladpur Politics: पोलादपुरात संख्याबळ नसताना राष्ट्रवादीचा नगराध्यक्षपदावर दावा; आशा गायकवाड यांचा अर्ज दाखल

रायगडाच्या पायरी मार्गावर आजही तीन ठिकाणी कातळात कोरलेल्या शिवकालीन ऐतिहासिक पायऱ्या अस्तित्वात आहेत. खुबलढा बुरुजाच्या खालच्या बाजूस तसेच महादरवाजा ते हत्ती तलाव या मार्गादरम्यान या कोरीव पायऱ्या पाहावयास मिळतात. रायगड विकास प्राधिकरणाने पायरी मार्गाच्या विकासकामांदरम्यान या ऐतिहासिक पायऱ्यांचे मूळ स्वरूप अबाधित ठेवत त्यांच्या बाजूने नवीन पायऱ्या उभारल्या आहेत.

हत्ती तलावाच्या खालच्या बाजूस असलेल्या मूळ घडीव पायऱ्या उंच, असमान आणि चढाईस तुलनेने कठीण आहेत. राज्याभिषेक सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या शिवभक्तांच्या सुरक्षिततेचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त या मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात समान उंचीच्या पायऱ्या बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यामुळे वृद्ध, महिला तसेच लहान मुलांसह येणाऱ्या भाविकांना गड चढणे अधिक सुलभ होणार असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले होते. त्यानुसार मूळच्या ११ असमान पायऱ्यांच्या जागी १८ समान उंचीच्या पायऱ्या उभारण्यात आल्या.

Raigad Fort Restoration
Cattle Fodder Crisis: वाढत्या उष्म्याने मोकाट गुरांची फरफट; चाऱ्याअभावी उकिरड्यावरील कचऱ्यावर गुजराण

या कामादरम्यान मूळ कातळात घडविलेल्या ऐतिहासिक पायऱ्यांना कोणतीही हानी पोहोचलेली नसल्याचा दावा प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे.

२७ जूननंतर पायऱ्यांचे लोकार्पण

दरम्यान, रायगड विकास प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूप कायम ठेवण्याच्या दृष्टीने नव्याने बसविलेल्या पायऱ्या हटविण्याची शिफारस केली आहे.

त्यानुसार २७ जून रोजी तिथीनुसार होणारा राज्याभिषेक सोहळा संपल्यानंतर हत्ती तलाव मार्गावरील १८ नवीन पायऱ्या काढून टाकण्यात येतील. त्यानंतर शिवकालीन मूळ घडीव पायऱ्या पुन्हा पर्यटक, अभ्यासक आणि शिवभक्तांसाठी खुल्या करण्यात येणार असून रायगडाचा ऐतिहासिक वारसा मूळ स्वरूपात जपण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news