Police Raid: सारळ येथील हायप्रोफाईल सोसायटीवर पोलिसांचा छापा

गांजा सेवन करणाऱ्या दोघांसह; व्हिसा संपलेल्या युक्रेनियन महिलेवर गुन्हा दाखल
Police Raid
Police RaidPudhari
Published on
Updated on

रायगड: रायगड जिल्ह्यामध्ये अमली पदार्थ विरोधी मोहिमेला गती देत, रायगड पोलिसांनी अलिबाग तालुक्यातील सारळ येथील एका हायप्रोफाईल सोसायटीत अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे.

या छाप्यात गांजा सेवन करणाऱ्या दोन ज्येष्ठ नागरिकांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्याच ठिकाणी बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या एका विदेशी महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे. मांडवा सागरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी एन.डी.पी.एस आणि इमिग्रेशन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Police Raid
Raigad Fort Restoration: रायगडावर बसविल्या शिवकालीन १८ पायऱ्या

पहाटेची गुप्त कारवाई आणि छापा

रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, आज रविवार, १४ जून २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास सारळ (ता. अलिबाग) येथील 'इनर सर्कल सोसायटी', रूम क्र. बी-०६ मध्ये स्थानिक गुन्हे शाखा व मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने अचानक छापा टाकला.

या कारवाईदरम्यान संबंधित रूममध्ये काही व्यक्ती पार्टी करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. तेथे दोन व्यक्ती कागदी नळीमध्ये भरलेला पदार्थ पेटवून त्याचा धूर ओढताना,अंमली पदार्थाचे सेवन करताना रंगेहाथ पकडल्या गेल्या. त्यांची अधिक चौकशी केली असता ते गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे निष्पन्न झाले.

Police Raid
Poladpur Politics: पोलादपुरात संख्याबळ नसताना राष्ट्रवादीचा नगराध्यक्षपदावर दावा; आशा गायकवाड यांचा अर्ज दाखल

याप्रकरणी पोलिसांनी सुनील बळीराम चावला (वय ६९ वर्षे, रा. इनर सर्कल सोसायटी, सारळ, अलिबाग) व हरेंद्र सिंग मंगल सिंग (वय ६५ वर्षे, रा. वरळी, मुंबई) या दाेघांना अटक केली आहे.

पंचांसमक्ष करण्यात आलेल्या कायदेशीर झडती दरम्यान आरोपींच्या ताब्यातून गांजा भरलेल्या कागदी नळ्या, अर्धवट जळालेली गांजाची नळी आणि लायटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाचे एकूण वजन अंदाजे ३ ग्रॅम इतके आहे. या दोन्ही आरोपींवर एन.डी.पी.एस. अॅक्ट (NDPS Act), १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) व २७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

युक्रेनियन महिलेवरही गुन्हा दाखल

याच कारवाईदरम्यान घटनास्थळावर युक्रेन देशाची एक महिला उपस्थित असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी तिच्या पासपोर्ट आणि व्हिसाच्या कागदपत्रांची कसून पडताळणी केली असता, तिचा व्हिसा अवघ्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच दिनांक १२ जून २०२६ रोजी संपल्याचे समोर आले. भारतात राहण्यासाठी कोणतीही वैध व समाधानकारक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने, या परदेशी महिलेविरुद्ध 'इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अॅक्ट २०२५' च्या कलम २३ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथक आणि नेतृत्व

ही धडक कारवाई रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि अलिबाग विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाई पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, सपोनि मानसिंग पाटील, सहा. फौजदार प्रसन्न जोशी, किशोर पाटील तसेच पोलीस अंमलदार विनोद पाटील, प्रतीक सावंत, रणजीत खराले, कौस्तुभ मगर, अमोल हंबीर, झुलिता भोईर, चेतन म्हात्रे, अक्षय पाटील आणि अनिकेत म्हात्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

रायगड पोलिसांचे आवाहन

जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांचे सेवन, विक्री किंवा साठा यासारख्या बेकायदेशीर गोष्टी सुरू असल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा रायगड पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news