

अलिबाग :सुवर्णा दिवेकर
अलिबागच्या पांढऱ्या कांद्याचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मदतीने केलेल्या प्रयत्नांना यश मिळताना दिसते आहे. सध्या अडीचशे हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड होत आहे. पांढऱ्या कांद्याच्या बीजोत्पादन कार्यक्रमामुळे अलिबाग तालुक्यात यंदा जवळपास अडीचशे हेक्टरने पांढऱ्या कांद्याचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे औषधी गुणधर्म आणि रुचकर चविच्या पांढऱ्या कांद्याच्या कक्षा रुंदावणार आहेत.
अलिबाग तालुक्यातील वेश्वी, वाडगाव, नेहुली, कार्ले, खंडाळे, पवेळे, रुळे, ढोलपाडा, सागाव, तळवली अशा मोजक्याच गावातच पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. या कांद्याला रुचकर चव आणि औषधी गुणधर्म असल्याने मोठी मागणी असते. मात्र मागणीच्या तुलनेत कांद्यांचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे हा कांदा निर्यातक्षम असूनही तो परदेशात पाठवला जाऊ शकत नाही.
तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या पेटंट विभागाने या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन दिले आहे. त्यामुळे कांद्याचे ब्रँण्डींग होण्यास आता मदत झाली. कांद्याच्या मागणीत चांगलीच वाढ झाली. ही बाब लक्षात घेऊन आता पांढऱ्या कांद्याचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाने प्रय़त्न सुरू केले असून, भविष्यात एक हजार हेक्टर वर या कांद्याची लागवड करण्याचे उद्दीष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे.
अलिबाग तालुक्यातील अडीचशे हेक्टर क्षेत्रावर पांढरा कांद्याची शेती केली जाते. साधारण पाच हजार टन उत्पादन दरवर्षी काढले जाते. यात वाढ करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने कांद्याच्या बीजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी शेतकऱ्यांचा कांदा गट तयार केला. 282 शेतकरयांच्या सहकार्यातून 2.36 हेक्टर क्षेत्रावर खास कांद्याचे बीजोत्पादन करण्यात आले. त्यातून 1 हजार 534 किलो इतके बियाणे उपलब्ध झाले आहे.
हे बियाणे अन्य शेतकरयांना पुरवून त्यांना पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यास प्रवृत्त केले जात आहे. या उपक्रमामुळे यंदा अलिबागमधील पांढऱ्या कांद्याचे क्षेत्र वाढून 450 ते 500 हेक्टरपर्यंत पोहोचणार आहे. अलिबाग मधील पांढरा कांदा लागवडीचे क्षेत्र एक हजार हेक्टर पर्यंत वाढवले जाणार आहे.
कधी होते लागवड
भातकापणीनंतर जमिनीत जो ओलावा शिल्लक असतो, या ओलाव्याचा कांदा लागवडीसाठी उपयोग होतो. साधारणपणे नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबर महीन्याच्या सुरवातीला शेतकरी नांगरणी करून या कांद्याची लागवड करतात. सेंद्रीय पध्दतीचा वापर करून कांद्याचे पिक घेतले जाते.
औषधी गुणधर्म
या कांद्यात मिथाईल सल्फाइड आणि अमिनो ॲसिडचे प्रमाण साध्या कांद्याच्या तुलनेत जास्त आढळते. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. पोटातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा उपयुक्त ठरतो. अनिमिया दूर होण्यासाठी हा कांदा मदतगार ठरत असल्याचे सांगितले जाते. कांद्यात फॅटचे प्रमाण नगण्य असते. अँटी ऑक्साईडचे म्हणूनही हा कांदा उपयुक्त ठरतो.
पांढरा कांदा उत्पादन वाढीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मागील वर्षी बीजोत्पादन कार्यक्रम घेतला होता. त्यातून बीजनिर्मिती झाली असून ते बियाणे शेतकऱ्यांना वितरीत केले जाणार आहे. त्यामुळे यंदा पांढरया कांद्याच्या लागवड क्षेत्रात वाढ होईल अशी अपेक्षा आहे.
वंदना शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी