

कोलाड ः कोलाड-रोहा मार्गांवर संभे गावाच्या हद्दीत स्कुटी चालकाने मोटारसायकलचालकाला जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू होण्याची घटना शुक्रवारी (5 डिसेंबर) घडली. यात दोनजण जखमी झाले आहेत.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, 5 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दिनेश भिकू पवार हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल वरून धाटाव ते कोलाड असा प्रवास करीत होता. त्याचवेळी स्कुटी चालक जावीर इब्राहिम शाह (रा. धाटाव, ता.रोहा) हा आपल्या ताब्यातील स्कुटीवर आपल्या सहकाऱ्याला घेऊन कोलाड ते धाटाव असा प्रवास करीत होता. दोघेही दुचाकी चालक संभे गावाच्या हद्दीत उघाडीजवळ आले असता जावीर शाह याने राँग साईडला येऊन दिनेश पवार याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
या अपघातात दिनेश भिकू पवार, विठ्ठल नगर, पो. रातवड, ता. माणगांव, जि. रायगड तसेच जावीर इब्राहिम शाह, रा. धाटाव, मुळगाव सिधावे टोला रामटोकोला, कसीया कशिनगर, उत्तरप्रदेश हे दोघे गंभीर जखमी झाले. तर दुचाकीवर पाठीमागे बस दोन सहकारी किरकोळ जखमी झाले.
जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र कोलाड येथे उपचारसाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून चालक दिनेश पवार ( वय 34 ) आणि जावीर इब्राहिम शाह हे मयत झाले असल्याचे सांगितले. स्कुटीवरील पाठीमागे बसलेले दोघांना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे दाखल करण्यात आले. याबाबत कोलाड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातात मयत झालेले दिनेश भिकू पवार यांच्या अपघाताची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, कोलाड येथे गर्दी करून कारवाईची तात्काळ मागणी केली.