

Alibag PNP Theatre Reopening
रायगड : अलिबाग तालुक्यातील सांस्कृतिक केंद्र असणारे पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळ म्हणजेच पीएनपी नाट्यगृह कलाकारांसाठी, नाट्य रसिकांसाठी लवकरचं खुले होणार आहे. पीएनपी नाट्यगृहाला 15 जून 2022 रोजी भीषण आग लागून दुर्घटना घडली. हताश झालेल्या नाट्य रसिकांसाठी पुन्हा एकदा या नाट्यगृहाच्या उभारणीचा संकल्प आमदार जयंत पाटील आणि नाट्यगृहाच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी दुर्घटनेच्या दिवशीच केला होता. त्यानुसार सोमवारी (दि. ७) शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या जन्मदिनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते हे नाट्यगृह रसिकजनांच्या सेवेत पून्हा रुजू होणार आहे.
दुर्घटनेमुळे पीएनपी नाट्यगृह तीन वर्षे बंद होते. अनेक नाट्यरसिकांची मोठी निराशा झाली होती. नाट्यगृह पुन्हा उभे करण्यासाठी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली. अखेर कलाकारांसाठी पीएनपी नाट्यगृह पुन्हा उभे राहिले. सोमवारी नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ होणार आहे. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अलिबागसह जिल्ह्यातील कलाकारांना, नाट्य रसिकांना हक्काचे व्यासपीठ लवकरच खुले होणार आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत प्रभाकर पाटील उर्फ भाऊ यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांची आठवण कायम स्मरणात राहावी, म्हणून पीएनपी नावाचे नाट्यगृह अलिबागच्या प्रवेशद्वारासमोर चेंढरे येथे उभे राहिले. हे नाट्यगृह सहकार तत्वावरील महाराष्ट्रातील पहिले नाट्यगृह असून या नाट्यगृहामधून वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात होते. राज्य पातळीवरील वेगवेगळी नाटके याच मंचावर झाली होती. पीएनपी नाट्यगृहाची दुर्घटना अनेकांच्या जिव्हारी लागली होती.
फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभारी घेणे ही शेतकरी कामगार पक्षाची ओळख आहे. त्या दृष्टीने पाठपुरावा करून पीएनपी नाट्यगृह पुन्हा उभे करण्यास सुरूवात केली. सर्व अत्याधुनिक सर्व सोयी-सुविधायुक्त असणारे नाट्यगृह उभारण्यात आले आहे. वातानुकूलित आधुनिक तंत्रज्ञान, जेबीएल साऊंड सिस्टीमचा वापर करून सुसज्ज असे 722 आसन व्यवस्था असणारे, मुबलक पार्किंग व्यवस्था असणारे नाट्यगृह रसिकांसाठी सज्ज झाले आहे. नाट्यगृहाचे दर अन्य नाट्यगृहांप्रमाणेच सर्व सामान्यांना परवडतील असे असणार आहेत. स्थानिकांना दरामध्ये विशेष सवलत दिली जाणार आहे. तसेच भविष्यात नाट्यगृहातील ॲड. नाना लिमये रंगमंचावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून स्थानिक कलाकारांना संधी दिली जाणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी दिली.