

जयंत धुळप
रायगड: सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या आरमाराची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि त्यांनीच वसवलेल्या अलिबाग शहराच्या केंद्रस्थानी श्री काळंबामाता देवीचे मंदिर हे अत्यंत प्राचीन, निसर्गरम्य आणि जागृत श्रद्धास्थान म्हणून विराजमान आहे.
अलिबागकरांची ग्रामदेवता आणि रक्षक मानल्या जाणाऱ्या काळंबामातेच्या मंदिराला शेकडो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे.
या मंदिराचा ऐतिहासिक संबंध मराठा आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळाशी जोडला जातो. अलिबाग शहराची स्थापना आणि सागरी आरमाराची उभारणी होत असताना, आंग्रे घराण्याने शहराच्या विविध भागांत आणि किल्ल्यांच्या संरक्षणासाठी मंदिरांची निर्मिती केली.
समुद्रावर सफरीला निघण्यापूर्वी आणि दर्यावर मोहिमा आखण्यापूर्वी मराठा नाविक, आरमार सैनिक आणि स्थानिक कोळी बांधव काळंबामातेचा कौल घेऊन तिचे आशीर्वाद घेत असत. दर्यातील चक्रीवादळे, जलसंकटे आणि शत्रूच्या आक्रमणांपासून रक्षण करणारी शक्ती म्हणून काळंबामातेला विशेष स्थान मिळाले.
अलिबागच्या बालाजीनाका परिसरात वसलेल्या या मंदिरात काळंबामातेची तेजस्वी आणि प्रसन्न पाषाणी मूर्ती आहे. मंदिराची वास्तुशैली आणि शांत परिसर भाविकांना आत्मिक शांतता प्रदान करते. अलिकडेच या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आल्याने हे मंदिर आता अलिबागला येणाऱ्या पर्यटकांकरिता देखील एक आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
वर्षातील नवरात्रोत्सव आणि वार्षिक जत्रोत्सव हे या देवस्थानाचे मुख्य आकर्षण असतात. नवरात्रातील नऊ दिवस घटस्थापना, मंदिरात होम-हवन, अखंड दीपप्रज्वलन आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. नवरात्रात नऊ दिवस येथे छोटी यात्रा देखील भरते.
हाकेला धावणारी जगदंबा..
भक्तांच्या हाकेला धावणारी, संकटातून रक्षण करणारी आणि मनोकामना पूर्ण करणारी अलिबागची ग्रामदेवता श्री काळंबामाता देवी भाविकांच्या पाठीशी अखंड उभी राहणारी, नवसाला पावणारी प्रत्यक्ष जगदंबा मानली जाते. मुंबई पुण्यापासून श्रद्धाळू येथे येत असतात.