

अलिबाग: अलिबाग तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान नोंदवले गेले असले, तरी पावसाच्या असमान आणि अनियमित वितरणामुळे खरीप पिकांवर पाण्याचा गंभीर ताण निर्माण झाला आहे.
एल निनोच्या पार्श्वभूमीवर हवामानात झालेले बदल आणि गेल्या १८ ते १९ दिवसांपासून पावसाने दिलेला ताण यामुळे तालुक्यातील पिके धोक्यात आली आहेत. या प्रतिकूल परिस्थितीमुळे यंदा भात उत्पादनात प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ३० ते ४० टक्के घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात एकूण ९,०२०.४० हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये ८,९०६.११ हेक्टरवर भात, २५.५० हेक्टरवर नाचणी आणि ८८.१० हेक्टर क्षेत्रावर बांधावरील तुरीच्या पिकाचा समावेश आहे.
अलिबाग तालुक्याची दीर्घकालीन सरासरी पर्जन्यमानाची नोंद २,२१३ मिमी इतकी आहे, तर यावर्षी आजअखेर तालुक्यात २,३६१.९ मिमी पाऊस झाला आहे. एकूण पाऊस सरासरीहून अधिक असूनही, योग्य कालावधीत पाऊस उपलब्ध न झाल्याने पिकांना पाण्याचा मोठा फटका बसला आहे.
यंदा जूनच्या अखेरपर्यंत पेरण्या सुरू होत्या. त्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रोपवाटिकांचे नुकसान झाले. आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील तीव्र ऊन व पावसाचा खंड यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे.
अनेक ठिकाणी शेतांना भेगा पडल्या असून पिके पिवळी पडू लागली आहेत. सध्या हळवी पिके दाणे भरणे व फुलोऱ्यात, निमगरवी पिके पोटरीच्या अवस्थेत, तर गरवी पिके फुटवा अवस्थेत आहेत. ओलावा कमी झाल्याने दाणे भरण्यावर आणि पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होत आहे. तसेच खोडकिडा आणि कडाकरपा यांसारख्या कीड-रोगांचा प्रादुर्भावही वाढला आहे.
कृषी विभागाचे मार्गदर्शन व उपाययोजना
या संकट काळात पिकांना दिलासा देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी तन्मय अरविंद भगत यांनी शेतकऱ्यांना उपलब्ध जलस्रोतांचा सूक्ष्म आणि योग्य वापर करण्याचा सल्ला दिला आहे. दाणे भरणे व पोटरीच्या टप्प्यातील पिकांना पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच सिंचनाची सुविधा असल्यास पिकांच्या प्रतिकारक्षमतेसाठी पोटॅशियम नायट्रेट (१३:०:४५) या खताची १ टक्के द्रावणात फवारणी करावी आणि शिफारशीनुसार युरियाचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. फळबागांचे रक्षण करण्यासाठी जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणारे जैविक आच्छादन (मल्चिंग), पाणी धारण क्षमता वाढवणारा बायोचार आणि हायड्रोजेलचा वापर करावा, असेही कृषी विभागाने सुचवले आहे. खरीप हंगामातील या असमान पावसाचा फटका आगामी रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रावरही बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.