

राजकुमार भगत
उरण: जवाहरलाल नेहरू बंदर आणि राष्ट्रीय महामार्ग ४८ यांना थेट जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित पागोटे-चौक द्रुतगती मार्गाच्या बांधकाम निविदा उघडण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार या निविदा आता ३० ऑक्टोबर २०२६ रोजी उघडल्या जाणार आहेत. निविदा उघडण्यासाठी मुदतवाढ देण्याची ही पहिलीच वेळ नसल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पासाठी एकूण ३ हजार ६५३.०९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प बीओटी (बांधा, वापरा, हस्तांतरित करा) तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. या पद्धतीत निवड झालेली कंपनी रस्ता बांधते, ठरावीक कालावधीसाठी त्याचा वापर करून टोलच्या माध्यमातून गुंतवणूक वसूल करते आणि त्यानंतर तो सरकारकडे हस्तांतरित करते.
पागोटे (जेएनपीटी)-चौक हा मार्ग २९.३ कि.मी. लांबीचा सहापदरी ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग असेल. म्हणजेच तो पूर्णपणे नव्या जागेतून जाणार असून प्रवेश-नियंत्रित असेल. ठरावीक ठिकाणीच वाहनांना मार्गात प्रवेश आणि बाहेर पडण्याची मुभा असल्याने वाहतूक अखंड आणि वेगवान राहण्यास मदत होते.
या मार्गामुळे जेएनपीटी बंदराला राष्ट्रीय महामार्ग ४८, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा महामार्ग यांच्याशी थेट जोडणी मिळणार आहे. हा प्रकल्प अभियांत्रिकीदृष्ट्या आव्हानात्मक मानला जात आहे. मार्गावर सहा मोठे पूल, पाच लहान पूल, चार उन्नत मार्ग (व्हायाडक्ट) आणि दोन बोगदे प्रस्तावित आहेत.
यापैकी पहिला बोगदा १.९ कि.मी., तर दुसरा १.५७ कि.मी. लांबीचा असेल. बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात झाल्याच्या तारखेपासून ३० महिन्यांत प्रकल्प पूर्ण करणे कंत्राटदारास बंधनकारक असेल. मात्र निविदा उघडल्यानंतर तांत्रिक आणि आर्थिक मूल्यमापन, सर्वात योग्य निविदाधारकाची निवड, कंत्राट वाटप आणि कार्यादेश असे टप्पे पार करावे लागतात.
३० महिन्यांची मोजणी सुरू होईल. त्यामुळे पुढे कोणताही अडथळा आला नाही तरी मार्ग प्रत्यक्ष वाहतुकीसाठी खुला होण्यास काही वर्षे लागतील. या मार्गाचा सर्वात मोठा फायदा पुणे आणि मुंबई यांच्यातील प्रवासाला होणार आहे.
पुण्याहून येणाऱ्या वाहनचालकांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर टोल नाक्यानंतर १० कि.मी.वर या मार्गावर उतरता येईल. तेथून ते थेट अटल सेतूच्या चिर्ले इंटरचेंजपर्यंत केवळ २० मिनिटांत पोहोचू शकतील. यामुळे पनवेल, कळंबोली, नवी मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांवरील कोंडी टाळता येईल, असा अंदाज आहे.
आता ३० ऑक्टोबरला हाेणार
देशातील प्रमुख कंटेनर बंदरांपैकी एक असलेल्या जेएनपीटीमधून रोज मोठ्या प्रमाणात अवजड मालवाहतूक होते. नवीन द्रुतगती मार्गामुळे ही वाहतूक थेट आणि वेगवान मार्गाने राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांपर्यंत पोहोचू शकेल. त्यामुळे स्थानिक रस्त्यांवरील ताण कमी होण्यासह मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च घटण्याची अपेक्षा आहे.
३० ऑक्टोबरला निविदा उघडल्यानंतर कोणत्या कंपन्या स्पर्धेत आहेत आणि त्यांच्या बोली किती आहेत हे स्पष्ट होईल. आतापर्यंत तारखा वारंवार पुढे गेल्याने यावेळी तरी प्रक्रिया नियोजित वेळेत पार पडते का, याकडे संबंधित कंपन्यांचे आणि या भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.