

अलिबाग : कोकणच्या मातीतून आलेला आणि चवीसाठी ओळखला जाणारा अलिबागचा हापूस आंबा यंदाच्या हंगामात सर्वप्रथम वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाला आहे. अलिबाग तालुक्यातील केतकीचा मळा येथील आंबा उत्पादक शेतकरी गौरव शंकर पाटील यांच्या बागेतील आंब्याच्या दोन पेट्या वाशी एपीएमसी बाजारात दाखल झाल्या असून, या हंगामातील पहिली आंब्याची पेटी पाठविण्याचा मान गौरव पाटील यांना मिळाला आहे.
अलिबागचा आंबा स्थानिक ग्राहकांबरोबरच पर्यटकांच्या विशेष पसंतीचा असून, वाशी एपीएमसीमार्फत तो देश-विदेशातही पोहोचतो. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील आंब्याला मोठी मागणी असते. भातशेतीसोबत आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, विशेषतः तरुण शेतकरी आधुनिक पद्धतीने आंबा शेतीकडे वळताना दिसत आहेत.
यंदा पावसाने ऑक्टोबर अखेरपर्यंत हजेरी लावल्याने आंबा पिकासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य वेळी फवारणी व निगा राखल्यामुळे आंब्याचे झाड सुरक्षित राहिले. या कठीण हवामानातही गौरव पाटील यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणजेच यंदाच्या हंगामातील पहिली आंब्याची पेटी बाजारात दाखल होऊ शकली आहे. वाशी येथील एपीएमसी बाजारात दोन पेटी आंबा दाखल झाल्याची माहिती आंबा उत्पादक शेतकरी गौरव पाटील यांनी केली.
दरम्यान,यंदा थंडीने चांगलाच जोर धरला आहे.यामुळेतालुक्यासह जिल्ह्यातील आंबा पिक चांगलेच मोहोरले आहे.यामुळे फळही चांगली येत असल्याने बळीराजा सुखावला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आंबा शेती करत आहे. यंदा पाऊस लांबणीवर गेल्याने मोठे आव्हान होते. तरीही योग्य देखभाल आणि मेहनतीमुळे आंबा लवकर तयार झाला. या हंगामातील पहिली आंब्याची पेटी वाशी एपीएमसीला पाठविता आली, याचा आनंद आहे.
गौरव पाटील, आंबा उत्पादक शेतकरी