

मुरुड जंजिरा ः अकोला येथून मुरुड तालुक्यांतील काशीद समुद्र किनारी सहलीसाठी आलेल्या शॉरवीन क्लासचे शिक्षक राम कुटे (वय 60 वर्षे) आणि बारावीमध्ये शिकणारा विद्यार्थी आयुष रामटेके (वय 19) या दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तर आयुष बोबडे (वय 17 वर्षे, रा अकोला) या विद्यार्थ्यास वाचवण्यात लाईफगार्ड आणि पोलीसांना यश आले असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी दिली आहे.
अकोला शहरातील शॉरवीन क्लासच एकूण 3 शिक्षक आणि बारावीत शिकणारे 12 विद्यार्थी सहलीसाठी काशिद किनारी आले होते. शनिवारी सायंकाळी यातील काही मुले काशीद येथील समुद्र किनारी पोहण्यासाठी गेले होते. पोहता असताना यांतील शिक्षक राम कुटे,विद्यार्थी आयुष रामटेके आणि आयुष बोबडे हे तिघे समुद्रांच्या लाटांमध्ये खोल पाण्यात वाहून गेले. हे तिघे बुडत असल्याने त्यांच्या सोबत आलेल्या विद्यार्थ्यांनी काशिद समुद्र किनाऱ्यावरील पोलीसांना त्यांची माहिती दिल्याचे मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे यांनी सांगीतले.
पोलीस रेस्क्यू टिममधील पोलीस अंमलदार आर.बी. जैतू आणि लाईफ गार्ड ईश्वर चाचे, शुभम लाड, परेश रक्ते, सुरेश वाघमारे (रा. काशिद) यांनी तत्काळ समुद्रात पोहत पोहोचून बुडणाऱ्या या तिघांना मोठ्या जिद्धीने समुद्राच्या उसळत्या लांटांमधून बाहेर आणले. त्यावेळी राम कुटे यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती तर आयूष रामटेके हा बराचकाळ पाण्याखाली राहील्याने मृत झाला होता.
तर आयुष बोबडे यास सुखरुप वाचवून जीवदान देण्यात बचाव पथकास यश आले.तिघानर तत्काल बोर्ली येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यावर राम कुटे आणि आयूष रामटेके या दोघांना मृत घोषीत केले.
दरम्यान, आयुष बोबडे हा विद्यार्थी सुखरूप बचावला असल्याचे पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे यांनी सांगीतले. पावसाळा संपताच सुरु झालेल्या सहलीच्या प्रारंभाच्या हंगामात ही दुदैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी अधिक तपास मुरुड पोलिस करीत आहेत.
काशिद किनारी आतापर्यंत 32 पर्यंटकांचा बुडून मृत्यू
गेल्या सात वर्षांमध्ये काशीद बीच आणि चिकणी बीच या लोकप्रिय समुद्रकिनारपट्टींवर 32 पर्यटकांचे बुडून मृत्यू झाले आहेत.त्यापैकी काशीद बीचवर 29 जण व चिकणी बीचवर तीघाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नवीमुंबईतून अलिबाग समुद्र किनारी 1 नोव्हेबर रोजी फिरायला आलेल्या चौघा पर्यटक युवकां पैकी दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.