

उरण, कोप्रोली ः उरण तालुक्यातील धुतूम ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या इंडियन ऑईल अदानी व्हेन्चर्स लि. या कंपनीची तेल वाहिनी न्हावाशेवा रेल्वे स्टेशन जवळ फुटल्याने हजारो लिटर पेट्रोलची गळती झाली. या गळतीमुळे उरण-नेरूळ-बेलापूर लोकल रेल्वे बाधित झाली. दुपारी 12.30 पासून ही रेल्वे वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती. मात्र दरम्यान संध्याकाळी पाच वाजता वरिष्ठ पोलिस निरिक्षक हनिफ मुलानी यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हेपरचे प्रमाण शुन्य टक्क्यांपर्यत आले असून रेल्वे वाहतूक देखिल सुरु करण्यात आली आहे.
अदानी व्हेन्चर्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास न्हावाशेवा रेल्वेस्टेशनजवळच्या पागोटे उड्डाणपुला खालील तेल वाहिनीतून ही तेल गळती सुरु झाली. कंपनीचे अधिकारी संदीप काळे याच्याकडे विचारणा केली असता सकाळी या तेल वाहिनीली गळती लागली. याची माहिती कंपनीला मिळाल्यानंतर ताबडतोब येथे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आली.
या तेल वाहिनीतून जेएनपीएतून येणारे पेट्रोल कंपनीच्या प्लान्टमध्ये वाहून आणले जात होते. ही पेट्रोल गळती थांबविण्यासाठी प्रशासनाने तातडीने सुरूवात केली असली तरी हे दुरूस्तीचे काम आणि पेट्रोल गोळा करण्याचे काम दोन ते तिन दिवस चालण्याची शक्यता होती. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच रेल्वे अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. या बाबत मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.
पेट्रोलच्या बाष्फाने आगीची भीती
या तेलगळतीमुळे परिसरात पेट्रोलचे बाष्प तयार झाले होते. हे बाष्प धोकादायक पातळीवर असल्यामुळे आग लागण्याचा धोका निर्माण होऊन स्फोट होण्याचा धोका होता. त्यामुळे ताबडतोब जवळच्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आणि याची माहिती जवळून जाणाऱ्या रेल्वे विभागाला देण्यात आली. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता उरण -नेरूळ रेल्वे बंद करण्यात आली.
अदानी व्हेन्चर्सच्या तेल वाहिनीला गळती लागून त्यातून मोठ्या प्रमाणात पेट्रोल जमिनीवर आले होते. त्यामुळे परिसरात पेट्रोलचे व्हेपर (बाष्प) तयार झाले होते. हे बाष्पाचे वातावरणातील प्रमाण 11 टक्के एवढे होते. त्यामुळे आग लागण्याचा धोका होता. इंडियन ऑईल व्हेन्चर्सच्या प्रशासनाने दुरूस्ती सूरू केल्यानंतर दुपारी 4 वाजेपर्यंत हे बाष्पाचे प्रमाण 6 टक्क्यांपर्यत कमी झाले. त्यामुळे धोका कमी झाला आहे.
हनिफ मुलानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,उरण