

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 भागातील बार अँड रेस्टॉरंटच्या एन्ट्री गेटवर धक्का लागल्याच्या कारणातून ग्राहकाचा एका टोळक्याने चाकूने सपासप वार करून खून केला होता. ही घटना रविवारी 9 नोव्हेंबर रोजी रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. मानपाडा पोलिसांनी तपासचक्रांना वेग देऊन महत्प्रयासाने 6 खुन्यांना नाशिकमधून जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
अमर राजेश महाजन (36, रा. महाजन चाळ, कर्वे रोड, विष्णूनगर, डोंबिवली प.), अक्षयकुमार शंकर वागळे (26, धनलक्ष्मी एकविरा अपार्टमेन्ट, दावडी-रिजन्सी रोड, डोंबिवली-पूर्व), अतुल बाळू कांबळे (24, रेणुका चाळ, सरोवर नगर, कुंभारखाणपाडा, सुभाष रोड, डोंबिवली-पश्चिम), निलेश मधुकर ठोसर (42, शुभ सृष्टी अपार्टमेंट आंबेडकर चौक, बदलापूर-पूर्व), प्रतीकसिंग प्रेमसिंग चौहान (26, रा. विठ्ठल प्रसाद बिल्डिंग, आयरे रोड, डोंबिवली-पूर्व) आणि लोकेश नितीन चौधरी (24, रा. साई चरण निवास चाळ, सरोवर नगर, डोंबिवली-पश्चिम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या सहा जणांच्या टोळक्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात गोग्रासवाडीतील सरोवर बार जवळ राहणारा आकाश भानू सिंग (38) हा जागीच ठार झाला.
नवी मुंबाईतील एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करणाऱ्या दुर्दैवी आकाशचा धाकटा भाऊ बादल सिंग याने या संदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार मानपाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास चक्रांना वेग दिला होता.
असा घडला रक्तरंजित थरार...
आकाश सिंग आणि त्याचे मित्र जेवण करण्यासाठी गेले होते. हॉटेलमध्ये प्रवेश करताना आकाशचा धक्का एका ग्राहकाला लागला. धक्का मारला असा गैरसमज करवून अनोळखी इसमाने आकाशला शिवागीळ, मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. चुकून धक्का लागला आहे. हेतुपुरस्सर धक्का मारला नाही, असे आकाश आणि त्यांचे मित्र अनोळखी इसमाला समजावून सांंगत होते. तथापि तो इसम ऐकण्यास तयार नव्हता. त्या इसमाने आपल्या इतर साथीदारांना हॉटेलमध्ये बोलावून घेतले.
या टोळक्याने आकाश सिंग याला हॉटेलमधून फरफटत सार्वजनिक रस्त्यावर आणले. तेथे बेदम मारहाण केल्यानंतर सर्वांगावर चाकूने सपासप वार करून त्याला ठार केले. आकाशच्या बचावासाठी कुणीही पुढे आले नाही. सुनील कागले यांनी धाडस करून आकाश सिंग यांच्या बचावासाठी प्रयत्न केला. मात्र टोळक्याने सुनील यांच्या गालावर चाकूने वार करून त्यांनाही जखमी केले. मानपाडा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर तपास सुरू केला.
क्लू नसल्याने खुन्यांना पकडण्याचे आव्हान
घटनास्थळी कोणताही मागमूस नव्हता. त्यामुळे खुन्यांना पकडण्याचे पोलिसांपुढे कडवे आव्हान उभे होते. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा कस पणाला लावला. त्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक जयपालसिंह राजपूत, पोलीस निरीक्षक लक्ष्मण साबळे, पोलीस निरीक्षक मनिषा वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाला वेगवेगळ्या दिशांना रवाना करण्यात आले.
नाशिकच्या गल्ली-बोळांत थरारक पाठलाग
दुसरीकडे तांत्रिक विश्लेषण आणि खासगी गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सपोनि संपत फडोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिक गाठले. एका ठिकाणी सहा जणांची टोळी लपून बसली होती. पोलीस आल्याची कुणकुण लागताच या टोळक्याने तेथून धूम ठोकली. गल्ली-बोळांमध्ये आरोपींच्या मागे पोलीस असा थरार सुरू होता. अखेर सपोनि संपत फडोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिक शहर पोलिसांच्या मदतीने फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग करून या सहाही जणांची फर्लांगभर अंतरावर गठडी वळली.
डोंबिवलीत आणल्यानंतर या टोळक्याने आकाश सिंग याच्या खुनाची कबूली दिली. घटना घडल्यापासून अवघ्या 24 तासांच्या आत सहाही खुन्यांना हुडकून काढणाऱ्या पथकाचे जिल्ह्याचे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.