

पेण ः स्वप्नील पाटील
राज्यातील नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आघाडी आणि युतीसह सर्वच पक्षाची उमेदवारांची चाचपणी सुरू झाली असून रायगड जिल्ह्यातील पेण नगरपरिषदेच्या निवडणुकीतील अर्ज दाखल करण्याच्या सलग तिसऱ्या दिवशी देखील कोणत्याही पक्षाचा अगर अपक्ष उमेदवाराचा एकही अर्ज दाखल झाला नसल्याने यातून उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या बाबतीत संभ्रमात असल्याची चर्चा पेण शहरातील मतदारांमध्ये पहायला मिळत आहे.
नगरपरिषदेच्या निवडणुकीत 12 प्रभागांमध्ये 24 उमेदवार रिंगणात असणार असून 1 उमेदवार नगराध्यक्षपदाचा असे एकूण 25 उमेदवार मतदारांना निवडून द्यायचे आहेत. यासाठी आघाडी, युती यांसह इतर पक्ष आणि स्थानिक आघाड्यांची उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. मात्र पेण पालिका निवडणुकीचा विचार करता मागील काही दिवसांपासून आघाडीतील पक्ष आणि युतीतील पक्षांची जागा वाटप आणि उमेदवारांची निश्चिती यात ताळमेळ बसत नसल्याने शहरात आघाडी आणि युती होईल की नाही यात शंका व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे अर्ज दाखल करण्याचे तीन दिवस उलटून देखील यातील कोणत्याही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नाही. याव्यतिरिक्त मनसेने यापूर्वीच आपले सर्व उमेदवार स्वबळावर लढण्याची घोषणा जरी केली असली तरी त्यांनी देखील आपले उमेदवार अजून जाहीर केले नसल्याने त्यांचा देखील कोणताही उमेदवार अर्ज दाखल करू शकला नाही.
पेण शहरात माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी आपली आम्ही पेणकर विकास आघाडी घोषित केली असून त्यांनी त्यांचे काही उमेदवार घोषित देखील केले आहेत, मात्र उमेदवार जरी घोषित झाले असले तरी त्यांच्या आघाडीतील देखील कोणत्याही उमेदवाराने आजपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. पेण शहरात आघाडी बाबत तसेच युती बाबत जागावाटपाच्या गेली अनेक दिवस नेतेमंडळींच्या चर्चा सुरू आहेत, मात्र कोणाला किती जागा सोडायच्या आणि जागा सोडल्या तरी कोणत्या सोडायच्या याबाबत गणित बसत नसल्याने पेच निर्माण झाला आहे.
या सर्वपक्षीय नेत्यांमध्ये हा पेच जरी निर्माण झाला असला तरी इतर कोणत्याही अपक्ष उमेदवाराचा देखील अर्ज दाखल झाला नसल्याने पालिका निवडणुकीत पहिल्यांदाच सलग तीन दिवस कोणत्याही उमेदवाराचा अर्ज दाखल न झाल्याने निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींमधेच संभ्रम असेल तर ते पेण शहरातील नागरी समस्या तरी सोडवतील का, की त्यातही त्यांना संभ्रम निर्माण होईल असे मतदारांकडून बोलले जात आहे.
मतदार सुशिक्षित आणि नव्या चेहऱ्यांच्या शोधात
पेण शहरात अनेक इच्छुक उमेदवार असे आहेत की त्यांनी बऱ्याच वेळा या शहरात नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. मात्र आज बरीच वर्षे झाली तरी पेण शहराचा विकास हवा तसा झाला नाही. पेण शहर हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी पुढील एक ते दीड वर्षात मोठ्या प्रमाणात व्यापारीकरण होणार असल्याने पेणचा त्याप्रमाणे विकास होण्यासाठी आता सुशिक्षित आणि नवे चेहरे मतदार शोधत आहेत. हे नवे चेहरे कोण असतील हे उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेलाच स्पष्ट होणार आहे.
नाराज उमेदवारांची नवी फळी
पेण पालिका निवडणुकीत यंदा सर्वच पक्षांकडून अनेक नवनवे उमेदवार इच्छुक आहेत.मात्र जुन्या लोकप्रतिनिधींना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची तर जुने लोकप्रतिनिधी नाराज होतील आणि नव्या तरुण सुशिक्षित उमेदवारांना संधी दिली नाही तर ते नाराज होऊन बंडखोरीला वाव मिळेल त्यामुळे अनेक राजकीय पक्षांनी आपले कोणतेही उमेदवार जाहीर न केल्याने आजच्या सलग तिसऱ्या दिवशी देखील एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नाही. मात्र हेच नाराज इच्छुक उमेदवार इतर पक्षांचाकिंवा आघाडीचा आधार घेऊन पेण पालिकेत एन्ट्री करण्याची शक्यता नाकारली जात नाही.