Crime News : पनवेल एसटी स्टँडवर पोलिसांची नजर पडताच त्‍याची उडाली भंबेरी; तिहेरी हत्याकांडातील संशयित जाळ्यात!

जमिनीच्या वादातून आई, भाऊ आणि पुतण्याची हत्या केल्याचा आरोप; नवरात्र बंदोबस्तादरम्यान वाहतूक पोलिसांची सतर्कता
Crime News
Crime News : पनवेल एसटी स्टँडवर पोलिसांची नजर पडताच त्‍याची उडाली भंबेरी; तिहेरी हत्याकांडातील संशयित जाळ्यात!file photo
Published on: 
Updated on: 

Accused in triple murder case nabbed by police at Panvel ST stand!

पनवेल विक्रम बाबर : पुढारी वृत्तसेवा : नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पनवेल शहर वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. हाताला झालेली जखम आणि संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांचे लक्ष वेधलेल्या या इसमाची चौकशी केली असता, त्याने आपली ओळख उघड केली.

Crime News
LPG Price Today : आज गॅस सिलिंडर किती रुपयांना मिळतोय? मुंबईसह प्रमुख शहरांतील दर तपासा!

जमिनीच्या वादातून आई, भाऊ आणि पुतण्याची हत्या केल्याचे त्याने चौकशीत सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. दीपक फतेसिंग सुरडकर (वय ४४, रा. सोमठाणा, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला पुढील तपासासाठी बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

हातावरील जखमेने वेधले लक्ष

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या आदेशानुसार ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पनवेल एसटी स्टँड परिसरात विशेष मोहीम राबविण्यात येत होती. याचवेळी हाताला जखम झालेला एक इसम पोलिसांच्या नजरेस पडला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी सुरू केली.

नाव-पत्ता सांगण्यास टाळाटाळ

पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संबंधित इसमाची विचारपूस केली. सुरुवातीला त्याने नाव आणि पत्ता सांगण्यास टाळाटाळ केली. मात्र, पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर त्याने आपले नाव दीपक सुरडकर असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याबाबत मिळालेल्या माहितीची पडताळणी करण्यात आली असता, बुलढाणा जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड प्रकरणात तो पाहिजे असल्याचे समोर आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

Crime News
Navratri 2026 : नवरात्रीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; पाहा काय खावे अन् काय टाळावे?

जमिनीच्या वादातून तिघांची हत्या केल्याची माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून आई सरस्वती (वय ७५), भाऊ संजय (वय ४८) आणि पुतण्या रजित (वय २१) यांची हत्या केल्याचे संशयिताने चौकशीत सांगितले. या घटनेनंतर पोलिसांच्या भीतीने तेथून निघून आल्याचेही त्याने कथन केल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपीचा शोध

नवरात्रोत्सवामुळे एसटी स्टँड आणि शहरातील प्रमुख ठिकाणी नागरिकांची मोठी वर्दळ असताना वाहतूक पोलिसांनी संशयिताच्या हालचालींची दखल घेतली. त्यांच्या चौकशीमुळे गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी ताब्यात घेण्यात आला. पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी त्याला बुलढाणा पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. हत्येच्या प्रकरणातील आरोपांची स्वतंत्र पडताळणी आणि पुढील तपास संबंधित पोलिसांकडून केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news