संभाजीराजेंच्या दणक्‍यानंतर पुरातत्‍व खात्‍याची कारवाई; मदारमोर्चा वरील रंगरंगोटी हटवली ! | पुढारी

संभाजीराजेंच्या दणक्‍यानंतर पुरातत्‍व खात्‍याची कारवाई; मदारमोर्चा वरील रंगरंगोटी हटवली !

महाड ; पुढारी वृत्‍तसेवा

हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील मदारमोर्चा परिसरात अज्ञातांकडून रंगरंगोटी करण्यात आली होती. ही रंगरंगोटी चुकीची असल्‍याने केंद्रीय पुरातत्त्व विभागाने या संदर्भात तातडीने ती हटवावी अशी मागणी रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी लेखी पत्राद्वारे केली होती. यावर केंद्रीय पुरातत्‍व खात्‍याने या संदर्भात तातडीने पावले उचलत मदार मोर्चा येथील रंगरंगोटी हटवून ते ठिकाण पूर्ववत केले आहे.

 

दुर्गराज रायगड वरील मदार मोर्चा येथील प्रकाराची दखल घेत आज सकाळीच पुरातत्त्व विभागास पत्र लिहून केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या महासंचालिका विद्यावती जी व मुंबई विभागाचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ राजेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधून तात्काळ याविषयी योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचित केले. यास प्रतिसाद देत पुरातत्त्व विभागाने मदार मोर्चा येथील रंगरंगोटी हटवून ते ठिकाण पूर्ववत केलेले आहे. तसेच त्याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली असल्‍याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्‍या फेसबूक पोस्‍ट मध्ये म्‍हटले आहे.

Back to top button