रायगड : शिवसमाधीजवळ पूजा-विधी करणाऱ्या चौघांना चार दिवसांची पोलीस कोठडी - पुढारी

रायगड : शिवसमाधीजवळ पूजा-विधी करणाऱ्या चौघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

महाड; पुढारी वृत्तसेवा

किल्ले रायगडवरील शिवसमाधीजवळ अस्थी आणि राखेसह पूजाविधी करणाऱ्या चौघांविरुद्ध महाड तालुका पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर या चौघांनाही पोलिसांनी रात्रीच अटक केली. आज (दि.१२) सकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती महाड तालुका पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख यांनी दिली.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये इतिहास अभ्यासक आणि व्याख्याते सौरभ करडे, शैलेश वरखडे ,ओंकार घोलप, किरण जगताप (सर्व रा. पुणे) यांचा समावेश आहे. ८ डिसेंबर (बुधवार) रोजी हे चौघे रायगडवरील शिवसमाधीजवळ एका पुस्तकाचे पूजन करताना आढळून आले होते. त्यांच्याजवळ असलेल्या साहित्यात अस्थि आणि राख सदृश्य साहित्य आढळल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक पूजा झोळे, वैशाली बेलदरे पाटील आणि प्रदीप बेलदरे पाटील यांनी हा पूजा विधी उधळून लावला. या प्रकाराची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी रायगडवर जावून सर्व पूजा साहित्यासह सौरभ करडे आणि त्यांच्या साथिदारांना तालुका पोलीस ठाण्यात आणले.

शनिवारी (११ डिसेंबर) पूजा झोळे यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार सौरभ करडे, शैलेश वरखडे , ओंकार घोलप, किरण जगताप या चौघांविरुद्ध धामिक भावना दुखावल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम २९५, ३४, १५३ ए, १५३ ए (१) (ए) १५३ ए (१) (बी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्रीच त्यांना अटक करण्यात आली. आज (रविवारी ) त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तपास उपविभागिय पोलीस अधिकारी निलेश तांबे करीत आहेत.

हेही वाचलं का ?

Back to top button