Ajit Pawar : आम्हाला कायम गाफील का ठेवले ? : अजित पवारांचा शरद पवारांना सवाल | पुढारी

Ajit Pawar : आम्हाला कायम गाफील का ठेवले ? : अजित पवारांचा शरद पवारांना सवाल

हेमंत देशमुख

कर्जत : यापूर्वीच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाने आम्हाला कायमच अनेक निर्णय घेताना गाफील का ठेवले ? असा सवाल शरद पवार यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. त्यांनीच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला. आणि मग अचानक स्वतःच काही कार्यकर्त्यांना पुढे करून राजीनामा मागे घ्या, असे आंदोलन करण्यास का सांगितले, हा काय प्रकार होता हेच कळेना, असे म्हणत त्यांनी खेद व्यक्त केला.  Ajit Pawar

ते कर्जत येथील रेडिसन ब्लु येथे आयोजित अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या वैचारिक मंथन शिबिरात बोलत होते.
तसेच प्रथम आम्हाला भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्यास सांगून नंतर काही दिवसांत आपली भूमिका बदलत आम्हालाच जनतेसमोर खोटे का ठरवले, असा उद्वेगही अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांची वेळोवेळी बदलणारी भूमिका, धरसोड वृत्ती ही आमच्यासाठी न पटणारी होती, असे ही अजित पवार म्हणाले.  Ajit Pawar

आरक्षणासाठी जातीजातीत तेढ निर्माण होता कामा नये ….

सद्या महाराष्ट्रात आरक्षणावरून जे वातावरण निर्माण झाले आहे. यातून जातीजातीत तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच जाती धर्माच्या नेते मंडळींनी, सामाजिक नेत्यांनी कोणाची मन दुखावतील, अशी भडकावू भाषणे, बोलणे टाळावे, अशी विनंती केली. छत्रपती शिवाजी महाराज हे अठरा पगड जातींना बरोबर घेऊन पुढे जात राज्य चालवत होते. त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर कायम ठेवला पाहिजे. आताच्या नेत्यांची विधाने ऐकली की आता भांडणे होतात की काय, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. मात्र, मी असे होऊ देणार नाही, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. जात निहाय जणगणना झाली पाहिजे. ज्यांच्या जुन्या कुणबी नोंदी सापडत आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे,असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा 

Back to top button