रायगड : मोहो गावात ‘एक गाव, एक गणपती’ची ७० वर्षांची परंपरा | पुढारी

रायगड : मोहो गावात ‘एक गाव, एक गणपती’ची ७० वर्षांची परंपरा

पनवेल; विक्रम बाबर : लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रेरित होत गणेशोत्सवाला धार्मिकतेसह सामाजिक आणि समाजोपयोगी उपक्रमाचे स्वरुप देत गेल्या ७० वर्षांपासून पनवेल तालुक्यातील मोहो गावामध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना रुढ झाली आहे. जवळपास साडेतीनशे ते चारशे घरांची वस्ती असलेल्या मोहो गावात पक्षभेद, मतभेद, वाद-विवाद, भांडण-तंटे विसरुन ग्रामस्थ एकत्र येत श्री गणेशाची अनंत चतुर्दशीपर्यंत सेवा करीत असतात.

संबंधित बातम्या : 

गणेशोत्सव म्हटलं की, जिथं नजर जाईल, तिथे बाप्पांचे दर्शन घडतं. मग गावागावांत असो, पाड्यापाड्यांत किंवा गल्लोगल्ली. जिथं-तिथं घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचे गणपती दिसून येतात. मात्र, डोंगराच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य मोहो गावाने ‘एक गाव एक गणपती’च्या माध्यमातून जनतेसमोर आदर्श उभा केला आहे.

मान-पान, भाऊबंदकी वाद, शेजारी-पाजारी असलेले तंटे, पक्षभेद आदी गोष्टींनी समाजात सर्वत्र वाद उद्भवत असतात. त्यामधूनच गावातील ऐक्य बाधित होते. त्यामुळे ग्रामस्थांनी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना १९५४ मध्ये पुढे आणून गावातील श्री हनुमान मंदिरात गणपतीची प्रतिष्ठापना केली. यंदा मोहो गावाचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे ७० वे वर्ष आहे.

सलग दहा दिवस बाप्पाच्या चरणी श्री ज्ञानेश्‍वरी पारायण, प्रवचन, किर्तन, जागर भजन केले जाते. गावातील प्रत्येकाला बाप्पाच्या सेवेचा लाभ मिळावा, यासाठी प्रतिदिन ३५ ते ४० घरे गणपतीच्या सेवेसाठी नेमली जातात. विशेष म्हणजे, गणेश चतुर्थी ते अनंत चतुदर्शीपर्यंत वीणा जमिनीवर न ठेवता, त्याचे अखंड पूजन केले जाते.

लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव सोहळ्याचा आनंद विलक्षण असतो. सार्वजनिक गणेशोत्सव पार पाडण्यासाठी मोहोकर आनंदाने, एकजुटीने सहभागी होतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी वारकरी सांप्रदायातील मंडळींच्या भजन व पारंपरिक वाद्यांच्या मिरवणुकीद्वारे बाप्पाचे विसर्जन केले जाते. ग्रामस्थांमध्ये आपापसात कितीही वाद असले तरीही गणेशोत्सवकाळात गावाची एकी अबाधित असल्याचे दिसून येते. लोकमान्य टिळकांनी समाजाला जोडण्यासाठी, एकत्र आणण्यासाठी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा मोहो ग्रामस्थांनी जपून समाजापुढे आदर्श उभा केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button