Raigad News : चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुकर होण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज | पुढारी

Raigad News : चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुकर होण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

महादेव सरसंबे

रोहे : कोकणात ५ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर चाकरमन्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मुंबई पुणे, ठाणे यासह राज्यातून व राज्याबाहेरून आलेल्या चाकरमान्यांनी कामाच्या ठिकाणी परतण्यासाठी लगबग सुरु केली आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुलभ व सुखकार होण्यासाठी पोलीस प्रशासन, वाहतूक प्रशासन, आरोग्य प्रशासन, नगरपरिषद प्रशासन, महसूल प्रशासन, रेल्वे प्रशासन सज्ज झाला आहे. (Raigad News)

रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे-पाटील व वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल ते कशेडी घाटापर्यंत वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. परतीच्या प्रवासासाठी गणेशभक्तांना कोणतेही असुविधा होऊ नये, यासाठी वाहतूक पोलीस सज्ज आहेत. पनवेल ते कशेडीघाट पर्यंत ३५ अधिकारी व २४६ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. (Raigad News)

चाकरमनी रेल्वे, एसटी बस, खासगी बस, चारचाकी वाहनांचा वापर करतात. रोहा तालुक्यातील मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग मुरुड, रोहा, कोलाड, ताम्हाणे मार्गे पुणे, मुरुड, रोहा, वाकण, खोपोली मार्गे पुणे, रोहा नागोठणे मार्गे मुंबई व रोहा अलिबाग हा मार्ग गजबजलेला आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. रोहा पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चांगल्या पद्धतीने वाहतुकीचे नियोजन केले आहे.

रेल्वे पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ३ अधिकारी व ४२ रेल्वे पोलीस तैनात आहेत. रेल्वे पोलिसांनी रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापुर, जिते, आपटा, रसायनी, सोमाटणे या रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रवाशांची व सुरक्षेची प्रवासाची जबाबदारी चोख बजावली आहे.

रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्यासह ४ अधिकारी ४८ पोलीस कर्मचारी प्रशिक्षणार्थी १० व १० होमगार्ड गणेशोत्सवाच्या काळात रोहा पोलीस ठाणे हद्दीत तैनात आहेत. कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षक अजित साबळे यांच्यासह २ अधिकारी व ३५ कर्मचारी तैनात आहेत. मुंबई- गोवा महामार्गावरील सुकेळी खिंड ते कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासह कोलाड रोहा, कोलाड सुतारवाडी यादरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यात कोलाड पोलिसांनी चांगली भूमिका बजावली आहे.

नागोठणे हद्दीत पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्यासह ४ अधिकारी, २६ पोलीस कर्मचारी व ७ होमगार्ड तैनात आहेत. नागोठणे वाकण पाली, नागोठणे रोहा व नागोठणे आयपीसीएल मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवली आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी नागोठणे पोलीस सज्ज झाले आहेत.

हेही वाचा 

Back to top button