

महाड: पुढारी वृत्तसेवा : महाड तालुक्यातील कसबेशिवथर गावात शनिवारी (दि.४) रात्री साडेआठ वाजता जमिनीमधून मोठा हदरा झाल्याचा आवाज झाला. त्यानंतर परिसरात मोठे मोठे आवाज येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ही घटना कळताच महाड पोलीस अपत्ती विभाग घटनास्थळी रात्री पोहचले. व घटनेचा आढावा घेतला. दरम्यान, आज (दि.५) सकाळी या घटनेची दखल घेत महाडचे प्रांताधिकारी, तहसीलदार, एनडीआरफ टीम घटनास्थळी पोहचली आहे. यावेळी नागरिकांनी प्रशासनाकडे हा नेमका काय प्रकार आहे, याची विचारणा करून शोध घेण्याची मागणी केली.
महाड तालुक्यातील कसबे शिवथर, कुंभे शिवथर आणि चेराववाडी परिसरात दोन दिवसापासून भूगर्भातून स्फोटासारखे आवाज येत आहेत. शुक्रवारी सायंकाळी ४ नंतर दीड दोन तासाने अशा प्रकारे ६ वेळा जमिनीतून आवाज आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, जमिनीला अथवा घरांना तडे गेल्याचे प्रकार समोर आलेले नाहीत. प्रसंगावधान राखत या परिसरातील ग्रामस्थांनी जंगल भागात जाऊन जमिनीला अथवा डोंगराना भेगा पडल्या आहेत का? हे पाहण्यासाठी धाव घेतली. हा प्रकार समजल्यानंतर प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, तहसिलदार महेश शितोळे यांनी एनडीआरएफच्या टीमसह गावाला भेट देऊन ग्रामस्थांकडून झाल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. भूगर्भ तज्ञांना सोमवारी पाचारण करण्यात आले आहे. त्यानंतर झाल्या प्रकाराबाबत निष्कर्ष काढता येईल, असे प्रांताधिकारी बानापुरे यांनी सांगितले.
महाड तालुक्यात गेल्या दीड महिन्यात तुफानी पाऊस झाला आहे. काही दिवसापूर्वी पारमाची गावातील घरांना तडे गेल्याचे व जमिनीत उंचवटे निर्माण झाल्याचे प्रकार समोर आल्यानंतर येथील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याचे आवाहन केले होते. या दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून कुंभे शिवथर, कसबे शिवथर आणि चेराववाडी परिसरात जमिनीतून स्फोटासारखे आवाज येत असल्याने जनतेत घबराट निर्माण झाली आहे. स्थानिकांनी जंगल भागात जाऊन जमिनीला भेगा पडल्या आहेत का ? अथवा डोंगर भागात काही लक्षणे दिसत आहे का ? याचा शोध सुरु केला आहे.
यावेळी सरपंच रमेश सकपाळ व पोलिस पाटील श्रेया गुरव यांनी दोन दिवसांपासून या परिसरात जमिनीतून आवाज येत आहेत. शुक्रवारी सायंकाळी ४ नंतर असे आवाज दीड दोन तासाच्या फरकाने येत होते. मात्र, रात्री आठच्या दरम्यान आलेला स्फोटासारखा आवाज हा मोठा होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. यानंतर एनडीआरएफच्या टीमने गावाच्या आजुबाजुच्या परिसर व पांडव कालीन श्री शंकराचे मंदिराच्या परिसराची पाहणी केली. या परिसराची पाहणी करण्यासाठी भूगर्भ तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्या अहवालानंतर आवाजाचे कारण समजू शकेल, असे प्रांताधिकारी बानापुरे यांनी सांगून परिसरातील जनतेला सतर्कतेचे आवाहन केले.
हेही वाचा