रायगड: कशेडी घाटात टँकरची एसटी बसला धडक; ८ प्रवासी जखमी | पुढारी

रायगड: कशेडी घाटात टँकरची एसटी बसला धडक; ८ प्रवासी जखमी

धनराज गोपाळ

पोलादपूर: मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी घाटात टँकर आणि एसटी बसच्या झालेल्या अपघातात ८ जण जखमी झाले. ही घटना आज (दि.७) दुपारी १२ च्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्रापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर कशेडी घाटात ठाणे ते चिपळूण एसटी बसला (MH-14-BT-2635) टँकरने (UP-70-HT-7551) समोरून धडक दिली. या अपघातात एसटी बसमधील 8 प्रवाशी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये २५ प्रवासी होते.

या अपघातात अनंत दत्तात्रय विंचू (वय 65, रा. चिपळूण), सुरेश शंकर सोलकर (वय 60, रा. कामथे, चिपळूण), श्याम बापू पावरी (वय 65, रा. कुडली, ता. गुहागर), इरावती श्याम पावरी (वय 55, रा. कुडली, ता. गुहागर), वनिता गणपत रेणोसे (वय 70, रा. वाळूंज, ता. महाड), गणपत पांडुरंग रेणोसे (वय 75, रा. वाळू़ंज, ता. महाड), शुभांगी सुभाष येरूळकर (वय 65, रा. बिजगर खेड), बाळकृष्ण महादेव कदम (वय 75, रा. वडघर, ता. पोलादपूर) जखमी झाले. अनंत दत्तात्रेय विंचू यांना मोठी दुखापत झाल्याने कळंबनी उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर यांनी दिली.

या अपघाताची माहिती समजतात कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर, सुर्वे, साखरकर, चिकणे, चालक दुर्गावळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय कळंबणी ता. खेड येथे पाठविण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, पोलिसांनी दोन्ही वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे.

हेही वाचा 

Back to top button