

महाड; पुढारी वृत्तसेवा : महाड तालुक्यातील जागृत देवस्थानापैकी एक म्हणून चांभारखिंड येथील श्री सोमजाईमाता मंदिर हे अत्यंत प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची महती असून महाड तालुक्यातच नव्हे तर परराज्यातून आणि परदेशातून देखील भक्तगण, भाविक इथे दर्शनाला येत असतात. देवस्थान ट्रस्ट तर्फे वर्षभरात होळी, नवरात्र आणि इतर सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
यातील एक अनोखा उत्सवाचा भाग म्हणजे 'देवीची शेती' होय! अबालवृद्धांपासून सर्वच जण यात सहभागही होतात. महिलावर्ग नाचत गाणी गात ही देवीची शेती करत असताना दिसून येतात. सर्वजण मिळून तिथेच अन्न शिजवतात आणि एकत्रित बसून स्नेहभोजनाचा आनंद घेतात.भात लावणी करता करता चिखलात लोळून, खेळ खेळून सर्वजण या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटतात.
श्री सोमजाई देवीचे मंदिर हे ब्रिटिशकालीन असून ते पूर्वी जुन्या महामार्गालगत होते. त्याकाळी जेव्हा रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते तेव्हा देवी स्वयंभूरित्या आता मंदिर आहे त्याठिकाणी प्रकट झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी या ठिकाणी मंदिर बांधून सोनजाई देवी मंदिर ट्रस्टची स्थापना केली. देवस्थानाच्या आजूबाजूच्या परिसरात जी शेतजमीन आहे त्यावर 'देवीची शेती' करण्यात येते. अर्थातच त्या शेतात धान पिकवून ते आलेले पाहिले धान देवीला अर्पण केले जाते. यामध्ये प्रामुख्याने भात हे पीक घेतले जाते. वर्षभरातले देवीचे जे काही सण उत्सव साजरे होतात त्यावेळी महाप्रसादासाठी या धान्याचा वापर केला जातो. अशी माहिती येथील ग्रामस्थांकडून प्राप्त झाली आहे.