महाडमध्ये पूरसदृश्य स्थिती; रायगड, वाळण खोऱ्यात पावसाचे धुमशान | पुढारी

महाडमध्ये पूरसदृश्य स्थिती; रायगड, वाळण खोऱ्यात पावसाचे धुमशान

महाड; श्रीकृष्ण द बाळ : रायगड, वाळण खोऱ्यासह महाड तालुक्यात तसेच महाबळेश्वर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने महाड शहराच्या परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नगरपालिका प्रशासनाकडून भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचे इशारे देण्यात आले आहेत. दरम्यान, स्थानिक प्रशासनासह नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी दिली आहे.

सोमवारी मध्यरात्रीपासून महाडमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. नगरपरिषदेच्या निर्देशानुसार सायरन वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महाडमध्ये नगरपालिका प्रशासनाकडून पाच सखलभागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नदीकाठच्या नागरीकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रायगड व वारण परिसरामध्ये देखील मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. गेल्या चार दिवसाच्या सुट्टीनंतर शाळा व महाविद्यालय आज उघडण्यात आली. मात्र सकाळपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांना कसरत करावी लागली. महाड पालिका प्रशासनाकडून शहरातील नऊ ठिकाणी विशेष यंत्र बसविण्यात आली असून त्या मार्फत नागरिकांना सतर्कतेचे इशारे देण्यात येत आहेत. शहरात पुन्हा पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. दस्तुरी नाका, गांधारी नाका परिसरात पाणी रस्त्यावर आल्याची माहिती मिळत आहे. नगर पालिका प्रशासनाने आगामी काही तासांमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याची सूचना दिली आहे.

हेही वाचा : 

Back to top button