

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : खोटी कागदपत्रे बनवून भारतात राहणाऱ्या एका परदेशी महिलेला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी पनवेल न्यायालयाने बिरा रोज या युगांडातील महिलेला सहा महिन्याचा कारावास आणि एक हजार रुपये दंड थोटावला आहे.
भारतात राहण्यासाठी असलेला व्हिसा २०१७ सालीच संपला होता. तरीसुध्दा तोतयागिरी करून दुसऱ्याची माहिती वापरून बिरा रोज (रा. युगांडा ) या महिलेने त्यावर स्वतःचा फोटो लावला होता. तसेच 'सी' अर्ज भरून त्याद्वारे दस्तावेज बनवून ही महिला भारतात बेकायदेशीररीत्या राहत होती. याप्रकरणी या महिलेवर पासपोर्ट कायदा अंतर्गत तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तिच्याविरोधात न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले. त्यानंतर पनवेल येथील ४ थे सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर न्यायदंडाधिकारी उमा बोराडे-कपूर यांच्या न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोरे यांनी योग्यरित्या तपास करून याप्रकरणी न्यायालयात पुरावे सादर केले. व सरकारी वकील जयश्री कुलकर्णी यांनी दिलेला साक्षी पुरावा न्यायालयाने ग्राह्य मानला. त्यानंतर न्यायालयाने बिरा रोज या महिलेला दोषी ठरवत सहा महिने कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
हेही वाचा :