रायगड: पावसाचा जोर कायम; अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली | पुढारी

रायगड: पावसाचा जोर कायम; अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

नागोठणे : महेंद्र माने: येथील अंबा नदीने बुधवार (19 जुलै) काळी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर कायम असून पुराचे पाणी शहरातील काही भागात शिरले आहे. पुरामुळे शहरात मुख्य ठिकाणी येणारे तिन्ही रस्ते बंद झाले आहेत. तसेच एसटी स्थानकावरही पाणी असल्याने एसटी वाहतूक महामार्गावरून वळविण्यात आली आहे. नदी किनारील छोट्या-छोट्या दुकानदारांची धावपळ होऊन तारांबळ उडाली आहे.

गेले काही दिवस सतत पडणाऱ्या पावसाबरोबरच सोमवारी (दि.१८ जुलै) आणि मंगळवारी (दि.१९ जुलै) शहरासह डोंगर माथ्यावर देखील झालेल्या मुसळधार पावसाने अंबा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, पुराचे पाणी एस.टी.स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज बाजारपेठ, मरिआई मंदिर समोरील परिसर, कोळी वाडा, मटण मार्केट, हॉटेल लॅकव्हयू व सरकारी विश्राम गृहाचा परीसर तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. त्यामुळे एस.टी.स्थानकाशेजारील व शिवाजी चौकातील छोटे छोटे टपरीमधील व इतर दुकानदारांनी आपल्या दुकांनातील सामान सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली आहे.

नागोठणे शहरात येणारे तिन्ही ठिकाणचे मुख्य रस्ते बंद झाले आहेत. एस.टी.स्थानकात देखील पाणी असल्याने एसटी वाहतूकीसह इतर वाहतूक महामार्गावरून वळवल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तात्पुरत्या स्वरूपास बस थांबा करण्यात आला आहे. प्रवाशांचे हाल झाले असून, त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पुराचे पाणी वाढले तर आपल्या दुकानात पाणी शिरेल या चिंतेत येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार पेठेतील व्यापारी आहेत. पावसाचा जोर कायम राहिला तर या भागात पूर येण्याची शक्यता देखील जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा:

Back to top button