किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात | पुढारी

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

महाड; पुढारी वृत्तसेवा: किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात पोचली आहे. राजदरबारात उभारण्यात आलेल्या सजावटी संदर्भात त्रुटी लक्षात आल्या होत्या. त्यानंतर राजसदरेवरील करण्यात आलेले काम हटविण्यात आले. राजसदरेवरील पूर्वीची असलेली भिंत त्याच पद्धतीने ठेवण्याची सूचना रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी केली. त्यानंतर या सजावटीमध्ये अमुलाग्र बदल करण्याची कामे युद्ध पातळीवर सुरू झाली आहेत. पावसाची शक्यता लक्षात घेऊन संपूर्ण राजदरबार वॉटरप्रूफ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

या संदर्भात प्राप्त झालेल्या विश्वसनीय माहितीनुसार राजदरबारातील 2 जूनरोजी करण्यात आलेली सजावटीची बहुतांश कामे दूर करण्यात आली आहेत. ऐतिहासिक पद्धतीनेच हा कार्यक्रम शामियानामध्ये संपन्न व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
संपूर्ण देशभरातून 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी साडेतीन लाख शिवभक्त किल्ले रायगडावर येतील, अशी माहिती शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी दिली. किल्ल्यावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी समितीमार्फत 40 समित्यांची विविध विभाग निहाय स्थापना केली आहे. यामध्ये सुमारे 2700 सदस्य गेल्या तीन दिवसापासून कार्यरत आहेत. या समित्यांमध्ये अन्नपाणी व नाश्त्याची व्यवस्था समितीमार्फत करण्यात येणार आहे. पाणी, आरोग्य, पार्किंग स्टेशन या संदर्भात स्वतंत्र पद्धतीने सदस्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

या सोहळ्यासाठी आज दुपारी चार वाजेपर्यंत प्राधिकरणाचे अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे यांचे पाचाड मुक्कामी आगमन होणार आहे.

हेही वाचा 

Back to top button