किल्ले रायगडावरील राज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक ठरणार: भरतशेठ गोगावले | पुढारी

किल्ले रायगडावरील राज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक ठरणार: भरतशेठ गोगावले

महाड; पुढारी वृत्तसेवा: संपूर्ण विश्वाला प्रेरणादायी असलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर होणारा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात दोन जून रोजीचा राज्याभिषेक सोहळा हा सर्वार्थाने ऐतिहासिक होईल, असा विश्वास या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी आज (दि. २६) पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला.

देशभरातून येणाऱ्या लाखो शिवभक्तांसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, पालकमंत्री उदय सामंत खासदार श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे आदीसह रायगड जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.

आमदार गोगावले यांनी सांगितले की, एक जूनरोजी सायंकाळपासून होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये मर्दानी खेळ, सनई चौघडे, ढोल ताशे, हलगी तुतारी, खालूलेझीम, नगारा, यासह शाहीर व व्याख्यानांचे आयोजन केले आहे. गडाची दैवता शिरकाई देवीचे पूजन, श्री जगदीश्वर, श्री वाडेश्वर, छ. संभाजी महाराज जयंती तसेच शिव तुलादान, गोंधळ, जागर असे धार्मिक विधी संपन्न होणार आहेत. संदीप वेंगुर्लेकर यांच्याकडे किल्ले रायगडावरील विविध ठिकाणी ऐतिहासिक देखावे निर्माण करण्याची जबाबदारी दिली आहे.

२ जूनरोजी सकाळी साडेआठ वाजता पालखीचे राज दरबारामध्ये आगमन होऊन नऊ वाजता मुख्य सोहळ्यात सुरुवात होईल. राज्यातील विविध गडकिल्ल्यांवरून तसेच अन्य ठिकाणाहून आणलेल्या ११०८ पवित्र जल कुंभातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर जलाभिषेक करण्यात येईल. सिंहासना रोहण व मुद्राभिषेक कार्यक्रमाने हा विधी संपन्न होणार आहे. त्यानंतर पालखी मिरवणूक श्री जगदीश्वर मंदिराकडे रवाना होईल.

संभाव्य शिवभक्तांची गर्दी लक्षात घेऊन आपत्ती निवारण कक्षाने पायरी मार्गावर पाच ठिकाणी तर गडावर पाच ठिकाणी स्वतंत्र पथक निर्माण केली आहेत. वाळसुरे कोंझर या ठिकाणी वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. गडावर पाणी, आरोग्य सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पोलिसांचा चोख बंदोबस्त असेल.

या सोहळ्यानिमित्त सोलापूर येथून १०० शिवप्रेमी तुळजाभवानी ज्योत घेऊन रायगडावर येणार आहेत. प्रतापगड भवानी ज्योत, पाचाड येथून जिजाऊ ज्योत, तर फलटण येथून सईबाई यांची ज्योत स्थानिक शिवप्रेमी घेऊन येणार आहेत, अशी माहिती कोकणकडा मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली,

दि. २ जून २०२३ ते २० जून २०२४ पर्यंत सुरू राहणाऱ्या या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाड येथे जाणता राजा या महानाट्यसह व त्या स्वरूपाचे अन्य दोन मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती गोगावले यांनी दिली. रायगडकडे जाणाऱ्या मार्गाचे सध्या सुरू असलेले काम रविवारपासून (दि.२८) थांबविण्यात येणार आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराला प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्याचे आमदार गोगावले यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button