रायगड परिसरातील २१ शिवकालीन गावे विकसित करणार : छत्रपती संभाजीराजे | पुढारी

रायगड परिसरातील २१ शिवकालीन गावे विकसित करणार : छत्रपती संभाजीराजे

महाड; पुढारी वृत्तसेवा : गेल्या पाच वर्षांपासून किल्ले रायगड व परिसरात रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेली कोट्यवधी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. या परिसरातील २१ गावांना शिवकालीन गावे म्हणून विकसित करण्यात येईल, अशी माहिती रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज ( दि. ४ ) पत्रकार परिषदेमध्ये दिली. किल्ले रायगड हे पवित्र ठिकाण असून या परिसरामध्ये कोणत्याही पद्धतीचे राजकारण आपण करणार नाही. किल्ले व परिसरात झालेल्या संवर्धन व जतन कामाचे संपूर्ण उत्तरदायित्व शासनाने रायगड प्राधिकरणाला दिल्याचेही त्यांनी यावेळी  स्पष्ट केले.

मागील दोन दिवसापासून छत्रपती संभाजीराजे रायगड प्राधिकरणाने निर्माण केलेल्या डीपीआरमधील २१ गावांच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी विविध गावांमध्ये असलेल्या ऐतिहासिक वास्तू, घरे, वीरगळ यांचा अभ्यास करून यांचे जतन, संवर्धन रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून करून ही सर्व गावे शिवकालीन म्हणून विकसित करण्याचा निर्धार त्‍यांनी केला.

या २१ गावांतून असलेले वेगळेपण जपून त्यांना सुविधा देऊन रायगड प्राधिकरणासंबंधीत ग्रामपंचायत व गावातील ग्रामस्थांची करार करून याकामी त्यांचा आर्थिक स्तर वाढवण्यासाठी, तसेच येथील स्थलांतर रोखण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. दोन दिवसाच्या २१ गावांच्या दौऱ्या दरम्यान ग्रामस्थांनी व्यक्त केलेले प्रेम हे अविस्मरणीय होते. छत्रपतींच्या वंशातील एक म्हणून या सर्व ग्रामस्थांचे असलेले ऋणानुबंध माझे आयुष्यासाठी सदैव प्रेरणादायी ठरतील, अशा भावनाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.

केंद्रीय पुरातत्त्व विभाग व रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांसोबत जतन, संवर्धन कामाचे उत्तरदायित्व महाराष्ट्र शासनाने रायगड प्राधिकरणाला सोपविल्याले आहे. यासाठी प्राधिकरणाच्या ८८ एकर जमिनीवर निर्माण होणाऱ्या योजनांतून आर्थिक प्राप्ती होतील अशा पद्धतीच्या योजना निर्माण करण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखविला. किल्ले रायगड परिसरात धरणांची अपूर्ण असलेली कामे व पाणी टंचाईबाबत संबंधित विभागांच्या जबाबदारी असून याबाबत एक शिवभक्त म्हणून आपण नक्कीच लक्ष देऊ, अशी ग्‍वाहीही त्‍यांनी या वेळी दिली.

पाणीटंचाई संदर्भात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून या २१ गावांतील आवश्यक ठिकाणचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यात येतील. नातेखिंड किल्ले रायगड या मार्गावरील महामार्गाचे काम कोंझरपर्यंत ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

रायगड प्राधिकरणाला असलेली बांधकाम विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक असून मागील दीड वर्षापासून कार्यकारी अभियंतापद रिक्त असल्याने कामे करण्यात अडचणी येत आहेत. असलेल्या अधिकारी व संबंधितांच्या सहकार्यातून शासन दरबारी आपण अधिक गतीने काम करणार असल्याचे त्‍यांनी सांगितले. रायगड प्राधिकरणाच्या कामासंदर्भात शासनाने दिलेले दिशा निर्देश लक्षात घेता परिसरातील गडकिल्ले रायगड मॉडेल म्हणून विकसित करण्यासाठी फोर्ट फेडरेशनकडे दत्तक म्हणून देण्याची याप्रसंगी आपण शासनाकडे मागणी केल्याचे स्पष्ट केले. यावेळी रायगड प्राधिकरणचे प्रमुख अधिकारी वरूण भामरे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button