

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना भारतासाठी अत्यंत निराशाजनक राहिला. इंदूरमधील होळकर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ९ गडी राखत पराभव केला. ( IND vs AUS Indore Test ) विशेष म्हणजे, या सामन्यात नाणेफेक भारताने जिंकला होता. नाणेफेक जिंकूनही भारताने ११ वर्षानंतर घरच्या मैदानावर सामना गमावला, जाणून घेवूया या कसोटी मालिकेतील काही रंजक आकडेवारी ….
इंदूरमध्ये झालेल्या तिसर्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसापासून दोन्ही संघाच्या फिरकीपटूंसाठी खेळपट्टी अनुकूल राहिली. पहिल्या दिवशी १४ पैकी १३ विकेट फिरकी गोलंदाजांनी घेतल्या. संपूर्ण सामन्यात ३१ विकेटपैकी २६ विकेट फिरकीपटूंनी घेतल्या. दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजांनी केवळ चार बळी घेतले.
२०१२ मध्ये कोलकाता येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकूनही हा सामना गमावला होता. त्यानंतर ११ वर्षांनी इंदूर कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून सामना गमावला. भारताने घरच्या मैदानावर २२ सामन्यांत नाणेफेक जिंकली, यातील १९ सामने जिंकले तर तीन अनिर्णित राहिले आहेत. ऑस्ट्रेलिया संघाने १९९८ मध्ये बंगळूर येथे नाणेफेक गमावल्यानंतर शेवटची कसोटी जिंकली होती. त्यानंतर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक हारूनही सामना आपल्या नावावर केला.
इंदूरमध्ये खेळला गेलेल्या तिसर्या कसोटीत एकूण ११३५ चेंडू टाकण्यात आले. सर्वात कमी चेंडू खेळला गेलला हा चौथा कसोटी सामना ठरला आहे. २०२१मध्ये अहमदाबाद येथे इंग्लंड विरुद्घचा सामना सर्वात कमी म्हणजच केवळ ८४२ चेंडूचा ठरला होता. तर २०१९ मध्ये कोलकाता येथे भारत-बांगलादेशमध्ये झालेला कसोटी सामना ९६८ तर २०१८ मध्ये भारताने अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेला कसोटी सामन्यात १०२८ चेंडू टाकण्यात आले होते.
भारतीय संघाने कसोटी सामन्याच्या तिसर्याच दिवशी सामना गमावण्याची ही सहावी वेळ आहे. यापूर्वी २०१६-१७ मध्ये
पुण्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध, २००७-०८ अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध, २०००-०१ मध्ये मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध, १९९९-00 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि १९५१-५२ मध्ये कानपूरमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचा तीन दिवसात पराभव झाला होता.
भारत-ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असणार्या कसोटी मालिकेत तिन्ही सामन्यांमध्ये नाणेफेक हरलेल्या संघालाच विजय मिळाला आहे. पहिल्या दोन कसोटीत भारताने नाणेफेक गमावला तरी सामना जिंकला होता. तिसर्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या संघाने याचीच पुन्नरावृत्ती केली.
आतापर्यंत भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील तीन सामन्यांमध्ये ३८७० चेंडू टाकण्यात आले. १९०० नंतर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या खेळल्या गेलेल्या मालिकेत पहिल्या तीन सामन्यांमध्ये ३४११ पेक्षा कमी चेंडू टाकले गेले होते. तसेच
गेल्या दहा वर्षांतील भारताचा घरच्या भूमीवर तिसर्या कसोटी गमावली आहे.
टीम इंडियाने इंदूर कसोटी सामना जिंकला असता तर कसोटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली असती. मात्र ऑस्ट्रेलियाने विजय नोंदवत आपलं अंतिम सामन्यातील स्थान निश्चित केले. आता कसोटी विश्वचषकच्या अंतिम सामन्यात धडक मारण्यासाठी भारतीय संघाला अहमदाबाद कसोटी जिंकणे आवश्यक आहे. या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि न्यूझीलंड विरुद्घची कसोटी मालिका श्रीलंकेने २-0 अशी जिंकली तर श्रीलंका अंतिम फेरीत धडक मारेल; पण श्रीलंकेने ही मालिका १-0 अशी जिंकली तरी चौथ्या कसोटी सामन्याचा निकाल काहीही लागला तरी टीम इंडिया कसोटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारेल.
हेही वाचा :