पिंपरी : मोशी प्राधिकरणातील पीएमपी थांबा म्हणजे 'आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी' | पुढारी

पिंपरी : मोशी प्राधिकरणातील पीएमपी थांबा म्हणजे 'आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी'

श्रीकांत बोरावके : 

मोशी : ‘आग रामेश्वरी अन बंब सोमेश्वरी’ या प्रचलित म्हणीचा अनुभव सध्या मोशी प्राधिकरणातील नागरिक घेत आहेत. पीएमपी बस मार्गच नसलेल्या रस्त्यावर प्रशासनाने बस थांबा निर्माण केला आहे. हा बसथांबा तळीरामांचा हक्काचा अड्डा बनला आहे. मुळात ज्या रस्त्याने बसच जात नाही त्या रस्त्यावर बसथांबा का, आणि कोणत्या उद्देशाने उभारला आहे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
उत्तरेला मोशी-जाधववाडी रस्ता, दक्षिणेला स्पाईन रस्ता यांना जोडणार्‍या मोशी प्राधिकरणातील क्रांती चौक, स्केटर तेरामधील रस्त्यालगत काही वर्षांपूर्वी प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी बसस्टॉप उभारला होता.

या मागील हेतू जरी योग्य असला तरी ज्या रस्त्यावर बसस्टॉप उभारला आहे त्या रस्त्यावर बस जाते का, याचा आढावा घेण्यात आला नाही. यामुळे हा बसस्टॉप बांधल्यापासून आजतागायत केवळ धूम—पान करणार्‍यांसाठी हक्काची जागा बनली आहे.

तळीरामांचा नागरिकांना त्रास
रात्रीच्या वेळी तळीराम येथे दारू पिण्यासाठी बसतात. बसस्टॉप असलेल्या परिसरात चारही बाजूने रहिवाशी सोसायट्या आहेत. येथील नागरिकांचा रोजचा रहदारीचा रस्ता आहे. त्यामुळे महिला याच रस्त्यावरून ये-जा करत असतात, त्यांना या तळीरामांचा त्रास सहन करावा लागत आहे.

अनेकदा त्यांना हाकलले तरी ते आम्ही बससाठी येथे बसलोय अस सांगतात. आता त्यांना येथून बस जात नाही सांगणे म्हणजे प्रशासनाच्या कारभारावरच महाचर्चा घडविण्यासारखे होईल. यामुळे सुज्ञ नागरिक त्यांच्याशी वाद न घालता शांतपणे हा त्रास सहन करणे योग्य मानतात.

Back to top button