रायगड : लाडवलीजवळील घनकचरा प्रकल्पास आग; २६ लाखांचे नुकसान | पुढारी

रायगड : लाडवलीजवळील घनकचरा प्रकल्पास आग; २६ लाखांचे नुकसान

नाते: पुढारी वृत्तसेवा: महाड नगर परिषदेच्या लाडवली येथील क्रीडा संकुला पलीकडे असलेल्या घनकचरा प्रकल्पास गुरूवारी रात्री अज्ञाताने आग लावली. यात मशिनरी व इतर साहित्य जळून सुमारे २६ लाखांचे नुकसान झाले, अशी माहिती नगरपालिकेचे अधिकारी परेश साळवी यांनी दिली.

याबाबत त्यांनी सांगितले की, या परिसरात प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर वणवे लावण्यात येतात, या संदर्भात आवश्यक ती उपायोजना करण्यात आली होती. मात्र, गुरूवारी रात्री साडेतीन ते चार च्या सुमारास लागलेल्या वणव्याने मुख्य प्लांट शेजारील सुका घनकचरा आगीच्या भक्षस्थानी पडला. त्यानंतर आग मोठ्या प्रमाणात परिसरात पसरत गेली.

या ठिकाणी रात्री ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षक यांनी याची माहिती तातडीने नगरपालिका मुख्यालय येथे दिली. त्यानंतर महाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.

दरम्यान नगर पालिका प्रशासनाने सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चून ४ वर्षांपूर्वी घनकचरा प्रकल्प उभा केला आहे. परंतु येथे अत्यावश्यक असणारी अग्निशमन यंत्रणा उभी केलेली नाही. त्यामुळे अशा प्रकाराच्या दुर्घटना घडू नयेत. यासाठी अद्ययावत अग्निशमन प्रतिबंधात्मक यंत्रणा बसविण्याची मागणी लाडवली ग्रामस्थांकडून केली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button