रायगड : नेरळमध्ये पांढऱ्या कांद्याची शेती बहरली; पहिलाच प्रयोग उल्हास नदी तीरावर यशस्वी | पुढारी

रायगड : नेरळमध्ये पांढऱ्या कांद्याची शेती बहरली; पहिलाच प्रयोग उल्हास नदी तीरावर यशस्वी

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : अलिबागचा पांढरा कांदा विशेष गुणकारी म्हणून प्रसिद्ध असून या कांद्याला विशेष मागणी असते. या कांद्याची लागवड नेरळ जवळील कुंभे गावातील अंकुश शेळके यांनी केली आहे. कर्जत तालुक्यातील पांढऱ्या कांद्याचा हा पहिलाच प्रयोग असून कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. यात अंकुश शेळके यांना अलिबाग चोंढी येथील प्रगत शेतकऱ्यांचे देखील मार्गदर्शन मिळत आहे.

अंकुश शेळके यांची कुंभे येथे उल्हास नदीच्या तीरावर शेतजमीन आहे. तेथे ते गेली अनेक वर्षे मोगरा फुलाची शेती करतात. तसेच ते हिवाळ्यात कडधान्य तसेच पावसाळी भातपीकही घेतात. शेळके यांनी यावर्षी त्यांच्या शेतात भातशेती नंतर अर्ध्या एकर शेतात वाफे तयार करून ठेवले. तृणनाशकाची फवारणी करून झाल्यावर कृषी विभागाचे कशेळे मंडल अधिकारी विकास गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबागमधील चौंढी येथील प्रगत शेतकरी रमेश चिंबुलकर यांच्याकडून या कांद्याचे बियाणे आणले. या बियाणांची लागवड दोन दिवसात उरकली, अवघ्या महिनाभरात येथे कांद्याची शेती फुलली आहे.

गुणकारी पांढरा कांदा

चवीने तिखट असलेला पांढरा कांदा हा औषधी आणि गुणकारी समजला जातो. त्यामुळे पांढऱ्या कांद्याला विशेष मागणी असते. शेतीला पाण्याचे नियोजन महत्त्वाचे असल्याने शेळके यांनी पाण्याचे योग्य नियोजन केले. पुढील दीड महिन्यात कांद्याचे पीक हातात येणार असल्याने कर्जत कृषी विभाग मंडल अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व अंकुश शेळके यांनी आनंद व्यक्त केला. कर्जत तालुक्यात यंदा प्रथमच पांढऱ्या कांद्याची शेती केली जात आहेत. कोकण कृषी विद्यापीठाने मागील तीन वर्षे सातत्याने अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची राज्यातील सर्व जिल्ह्यांत लागवड करून पीक घेता यावे यासाठी प्रयत्न केले होते. दरम्यान, राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये पांढऱ्या कांद्याची शेती कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून केली गेली होती. गतवर्षी राज्यात पांढऱ्या कांद्याचे पीक यशस्वी झाल्यामुळे पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन देखील मिळाले आहे.

Back to top button