पनवेल : मुलुंडमध्ये २ कोटींची वीजचोरी उघडकीस | पुढारी

पनवेल : मुलुंडमध्ये २ कोटींची वीजचोरी उघडकीस

पनवेल: पुढारी वृत्तसेवा : कोरोनानंतरच्या काळात लोकांची फसवणूक करणारे चोर आता गुन्हे करण्यासाठी नवनवीन पद्धती वापरत आहेत. मुलुंडमध्ये महावितरणने राबवलेल्या  शोध मोहिमेत एका औद्योगिक ग्राहकाची ४३ लाख रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली. संबंधित ग्राहकाने मीटरमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट बसवून वीज चोरी केली होती. मुलुंड विभागाने मागील सहा महिन्यात तब्बल १ कोटी ८८ लाख रुपयांची वीजचोरी प्रकरणे उघडकीस आणली आहेत. महावितरणची मुलुंडमधील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. विशेष म्हणजे या वीजचोरी मध्ये घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांचा वीजचोरीचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुलुंड परिसरात वीजचोरी शोधण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान महावितरणच्या अधिकार्‍यांनी १०६ प्रकरणामध्ये एकूण विविध वीज चोरांकडून १ कोटी ८८ लाख वसूल केले आहेत. मुलुंड महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रेय भणगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणने आतापर्यंत तब्बल ४०० हून अधिक ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. महावितरणने आतापर्यंत १ कोटी ८८ लाख रुपयांची वीजचोरीची रक्कम चोरट्यांकडून वसूल केली आहे. महावितरणच्या मुलुंड विभागातील अधिकारी ते जनमित्रापर्यंतचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांच्या प्रयत्नांना चांगले यश आल्याचे भणगे यांनी सांगितले.

जागेवर जाऊन वीज मीटर तपासणी

विशेष म्हणजे वीजचोरी होत आहे की नाही, हे निश्चित करण्यासाठी महावितरणकडून कोरोनापूर्व आणि नंतरच्या ग्राहकांच्या वीज वापरावर सतत लक्ष ठेवले जात होते. तफावत आढळून आल्यावर महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक थेट ग्राहकाच्या ठिकाणी जाऊन वीज मीटर तपासून ते चुकीचे आढळल्यास ते जप्त करायचे. शिवाय वीजबिल न भरल्यास संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महावितरणकडून सुरू केली जात असे. अनेक प्रकरणांमध्ये काही चोरट्यांनी वीज मीटरमध्ये छेडछाड केली होती आणि रिमोट-कंट्रोल पद्धतीने वीज युनिट्स नियंत्रित करण्यासाठी मीटरमध्ये सर्किट देखील बसविले होते. अनेक चोरट्यांनी डीपीवरून वा फिडर पिलर मधून वीज जोडणीद्वारे बेकायदेशीरपणे वीजचोरी केली होती.

वीजचोरी केल्यानंतर मूळ वीज चोरीचे देयक ग्राहकांना तत्काळ भरावे लागते आणि जर संबंधित व्यक्तीने अथवा वीजचोराने तडजोडीची रक्कम भरली. तर त्याच्यावर महावितरणकडून पुढील कारवाई केली जात नाही. मात्र, तडजोडीची रक्कम न भरल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते आणि गुन्हा देखील दाखल केला जातो, असे कार्यकारी अभियंता भणगे यांनी सांगितले. दरम्यान, ग्राहकांनी अनधिकृत वीज जोडणी घेऊ नये, वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम सुरूच राहणार असल्याचा इशारा भणगे यांनी दिला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button