Raigad : बनावट कागदपत्रांनी आठ इमारतींचे बांधकाम! गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश | पुढारी

Raigad : बनावट कागदपत्रांनी आठ इमारतींचे बांधकाम! गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पनवेल; विक्रम बाबर : पनवेल तालुक्यातील विहिघर गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका नामांकीत बांधकाम व्यावसायिकाने जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट शिक्के, ठसे तसेच बनावट सह्या, शासकीय अभिलेख व आदेश बनवून चार मजली इमारतीचे बांधकाम सुरु केले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या इमारतीमध्ये घर घेण्यासाठी बुकिंग केलेल्यांचे घराचे स्वप्न अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणातील बांधकाम व्यावसायिकाचे आदिती सोनार (आरंभ इन्फ्राकॉर्न) असे आहे. यांनी पनवेल तालुक्यातील विहीघर ग्रामपंचायत येथे चार मजली अशा ८ इमारतींचे बांधकाम हाती घेतले होते. या ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नंबर 145/2 मध्ये हे बांधकाम होणार होते. त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केल्याचे त्यांनी ग्राहकांना सांगितलेले होते. संबंधित जागेचे प्राधिकरणाकडून परवानगी घेतल्याचे बनावट कागदपत्र त्यांनी ग्राहकांना दाखवले. बांधकाम परवान्यावर जिल्ह्याधिकाऱ्यांची सही व शिक्के केल्याचे दाखवून शेकडो ग्राहकांकडून बुकिंग करुन घेतले. पण हे सर्व कागदपत्र बनावट आहेत, अशी समाजसेवक मिलींद खाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. खाडे यांनी माहितीच्या अधिकाराखाली सर्व कागदपत्र मागवून हा प्रकार उघडकीस आणला.

विहीघर गावातील सर्व्हे नंबर 145/2 मध्ये या इमारती उभारल्या जात होत्या. पनवेल तालुक्यातील शेती तसेच अन्य जागा या 2013 पासून सिडको (नैना) प्राधिकरणाच्या ताब्यात गेल्या आहेत. 2013 मध्ये निघालेल्या अधिसूचने नुसार या तालुक्यात नवीन बांधकामासाठी सिडकोची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र सदरील बांधकाम व्यावसायिकाने सिडकोची परवानगी न घेता जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घेतल्याचे कागदपत्र सादर केले.

या बाबतची माहिती समाजसेवक मिलींद खाडे यांना मिळाल्यानंतर खाडे त्यांनी याबाबत माहितीच्या अधिकाराखाली कागपत्र मागविली. त्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. तक्रार अर्जावर शहानिशा केल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकाने बनवलेले पेपर या कार्यालयातून निर्गमित केले नसल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.  यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी रोजी दिले आहेत. अर्जदार मिलींद खाडे यांच्या तक्रारी नंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशा नंतर खांदेश्वर पोलीस ठाण्यात याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

जागा सिडको प्राधिकरण हद्दीतील मात्र कागदपत्रे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाची

पनवेल तालुक्यातील विहिघर हद्दीतील सर्व्हे नंबर 145/2 ही जागा, सिडको (नैना) नियोजन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात आहे. 10 जानेवारी 2013 ला जाहीर केलेल्या अधिसुचनेनुसार नियोजन प्राधिकरण बदलण्यात आले आहे. या अधिसूचनेनुसार या हद्दीत नवीन इमारती उभ्या करण्यासाठी नैना प्राधिकरणाची परवानगी घेणे गरजेचे आहे. मात्र विहिघर ग्रामपंचायत हद्दीत बांधकाम व्यावसायिक अदिती सोनार यांनी आरंभ इन्फ्राकॉर्नच्या नावाने इमारती उभ्या करण्यासाठी आवश्यक असलेले पेपर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातून बनल्याचे सादर करून, सर्व्हे नंबर 145/2 मध्ये 8 इमारती बांधणार असल्याचे भासवून 200 हुन अधिक बुकिंग घेतल्याचा आरोप तक्रारदार मिलींद खाडे यांनी केला आहे.

खांदेश्वर पोलिसांकडून सदर प्रकरणाची चौकशी सुरू

जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशा नंतर बनावट कागदपत्र प्रकरणी खांदेश्वर पोलीसांनी चौकशी सुरू केली आहे. संबंधित प्रकरणातील पेपर आम्ही मागवून घेतले असून चौकशी सुरू आहे. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली.

सदरील जागेचे सर्व पेपर एजंट ने बनवले आहेत. त्याची माहिती आम्हाला नंतर मिळाली. त्या नंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र देऊन याबाबत माहिती दिली. मात्र आम्हाला कार्यालयाकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. तसेच सदर प्रकरणी मला कोणतेही पत्र आले नाही.
– आदिती सोनार बांधकाम व्यावसायिक

हेही वाचा

Back to top button