रायगड : दिवाळीचे रेशन किट कधी मिळणार? म्हसळा तालुक्यातील नागरिकांचा सवाल
म्हसळा; पुढारी वृत्तसेवा : सरकारने शंभर रुपयांमध्ये दीपावली आनंद शिधा (किट) देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु दिवाळी तीन दिवसांवर आली असतानाही अद्याप रेशन दुकानांतून या किटचे वाटप होत नसल्याने, दिवाळी रेशन किट कधी मिळणार, असा सवाल म्हसळा तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांकडून केला जात आहे.
राज्यातील गोरगरीब जनतेला दिवाळी सण आनंदात व उत्साहात साजरा करता यावा आणि यंदाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी शिंदे फडणवीस सरकाने शंभर रुपयांत एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक लिटर पामतेल असे चार वस्तूंचे संच वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात हा निर्णय जनतेला थोडाफार दिलासा देणारा असला तरी अद्याप म्हसळा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना किटचा पुरवठा करण्यात आलेला नाही. दोन दिवसांवर दिवाळी आली असताना रेशन किट मिळाले नसल्याने सर्वसामान्यांची दिवाळी गोड कशी होणार असा सवाल लाभार्थ्यांकडून केला जात आहे.
सरकारने शंभर रुपयांमध्ये दीपावली आनंद शिधा (किट) देण्याची घोषणा केली. मात्र, अद्यापही या किटचा पुरवठा न झाल्यामुळे लाभार्थ्यांनी सरकारच्या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त केला आहे. सणासुदीच्या काळात तरी घोषणा केल्यानंतर साहित्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे.
– नंदू शिर्के, माजी तालुका प्रमुख शिवसेनासरकारकडून जाहीर झालेले चार वस्तूंचे किट अजूनही म्हसळा तालुक्यात उपलब्ध झालेले नाही. दोन दिवसांत किट उपलब्ध होतील, अशी शक्यता आहे. किट उपलब्ध झाल्यावर रेशन दुकानदार यांचेमार्फत संबंधित लाभार्थ्यांना तात्काळ वितरण करण्यात येणार आहेत.
– समीर घारे, तहसीलदार म्हसळा
हेही वाचा :

