

महाड; पुढारी वृत्तसेवा _ महाड तालुक्यातील ईसाने कांबळे गावातीलजवान राहुल आनंद भगत यांना २ ऑक्टोबर रोजी बारामुल्ला येथे चकमकीत वीरगती प्राप्त झाली. आज (बुधवार) सकाळी ९ वाजता कांबळे तर्फे महाड गावातून हजारोंच्या उपस्थितीत रॅलीने शहीद राहुल भगत अमर रहे च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. कांबळे तर्फे महाड येथील वैकुंठभूमीत शासकीय इतमामात शहीद राहुल भगत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी भारतीय सैन्य दल, पोलीस प्रशासन आणि शासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत शहीद राहुल भगत यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी भारतीय सैन्य दलाचे सुभेदार राणा, महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार काशीद, डीवायएसपी निलेश तांबे, रायगड जिल्हा सैनिक बोर्डाचे अधिकारी साळुंखे, महाड 'एमआयडीसी'चे पोलीस निरीक्षक आंधळे, माजी सैनिक वाय. सी. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंगोली जिल्ह्यातील पिंपळदरी हे मूळ गांव असलेले शहीद राहुल भगत यांचे वडील आनंद भगत हे १९८० मध्ये नोकरीनिमित्त महाड तालुक्यातील इसाने कांबळे या गावी आले. चालकाची नोकरी करून आनंद भगत यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. शहीद राहुल हा त्यांचा मोठा मुलगा. राहुलचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चांढवे येथील हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर बारावीपर्यतचे शिक्षण महाड मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात घेतल्यानंतर २० जून २०१५ मध्ये राहुल भारतीय सैन्य दलात भरती झाला. भारतीय सैन्य दलात काम करीत असताना त्यांनी आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. गेली ८ वर्षे ते सैन्य दलात कार्यरत हाेते.
जम्मू -काश्मीर मधील बारामुल्ला सेक्टर १३ येथे राष्ट्रीय रायफल दलात इएमइ सेंटर सिकंदराबाद येथे ते कार्यरत होते. २ ऑक्टोबर रोजी दहशतवाद्यांशी मुकाबला करीत असताना राहुल भगत शहीद झाले. ठाणे येथे येऊर कॅम्पमध्ये त्यांची पत्नी व ३ वर्षीय मुलगा वास्तव्यास आहेत. गणेशोत्सवामध्ये ते आपली पत्नी व मुलासह इसाने कांबळे येथील घरी आले होते. ८ दिवसांपूर्वी आपल्या भावा सोबत व्हीडीओ कॉलव्दारे त्यांचे बोलणे झाले होते.
मंगळवारी सायंकाळी ४ वाजता शहीद राहुल भगत यांचे पार्थिव दिल्लीतून मुंबई येथे आणण्यात आले. तेथून रात्री उशीरा त्यांचे पार्थिव कांबळे तर्फे महाड येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. आज सकाळी कांबळे तर्फे महाड येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. महाड पोलादपूर तालुक्यातील हजारो नागरिक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाले होते. सकाळी ९ वाजता शहीद राहुल भगत यांची हजारोंच्या उपस्थितील कांबळे तर्फे महाड या गावातून अंत्ययात्रा काढून शहीद राहुल भगत अमर रहे अशा घोषणा देत त्यांच्या पार्थिवावर कांबळे तर्फे महाड येथील वैकुंठ भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा :