रायगड: हिरकणीवाडीचा विकास करताना ग्रामस्थ, आमदारांना विश्वासात घ्या | पुढारी

रायगड: हिरकणीवाडीचा विकास करताना ग्रामस्थ, आमदारांना विश्वासात घ्या

महाड; पुढारी वृत्तसेवा : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याच्या हिरकणी वाडीच्या तातडीने करावयाच्या संवर्धनासाठी शासनाने २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीच्या पूर्ततेसंदर्भात स्थानिक ग्रामस्थ तसेच आमदार भरतशेठ गोगावले यांना विश्वासात घेऊनच येथील कामे मंजूर करावीत, असे मत येथील ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. या निधीमधून प्रमुख नाल्यासह संरक्षक भिंत तसेच गावातील मूलभूत समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी सरपंच सावंत यांनी केली आहे. तर ग्रामपंचायत सदस्य संदेश ढवळे यांनी वीरमाता हिरकणीचे यथायोग्य स्मारक व गावाच्या वेशीवर प्रवेशद्वार उभारण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, मंजूर झालेला हा निधी रायगड प्राधिकरणाकडे वर्ग करण्यास हिरकणी वाडी ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला आहे. ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात यावीत, अशी आग्रही मागणी शासनाकडे आमदार गोगावले यांच्यामार्फत केली आहे.
गडावरून येणारे पाणी सुयोग्य पद्धतीने गावाबाहेर काढण्यासाठी नाल्याची निर्मिती तसेच गावाच्या खालील बाजूस संरक्षक भिंतीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तसेच ग्रुप ग्रामपंचायत निजामपूर अंतर्गत येणाऱ्या प्रमुख ९ वाड्यांमध्ये हिरकणी वाडीचा समावेश आहे. या वाडीमध्ये सध्या १२० घरांतून सुमारे ४०० नागरिक वास्तव्य करीत आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये निजामपूरसह वाघेरी, रायगडवाडी, टकमक वाडी, परडी, नेवाळे, खडकी, कोळी आवाड, आदिवासी वाडीचा समावेश आहे. या वाड्यांचाही विकास व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button