डोक्यात दगड घालून ‘प्रियकरानेच’ काढला ‘प्रेयसीचा’ काटा; लोणीकाळभोर पोलिसांनी तीन दिवसात लावला खूनाचा छडा

डोक्यात दगड घालून ‘प्रियकरानेच’ काढला ‘प्रेयसीचा’ काटा; लोणीकाळभोर पोलिसांनी तीन दिवसात लावला खूनाचा छडा
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: चारित्र्याच्या संशयातून प्रियकराने आपल्या प्रेयसीचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. वैशाली लाडप्पा दुधवाले (रा. भिमा कोरेगाव मुळ चिवरी,ता. उमरगा,जि.उस्मानाबाद) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. चार दिवसापुर्वी वैशाली हिचा मृतदेह थेऊर येथील यशवंत सहकारी कारखान्याच्या पडीक जागेत मिळून आला होता.

याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी प्रियकर महेश पंडीत चौगुले (वय.24,रा. तळेगाव दाभाडे, मुळ चिवरी,ता. उमरगा,जि. उस्मानाबाद) याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने खूनाची कबुली दिली. चौगुले हा तळेगाव दाभाडे येथील एका हॉटेलमध्ये काम करतो, तर वैशाली ही केअरटेकर म्हणून काम करत होती. पाच सहा महिन्यापासून दोघे एकमेकांच्या प्रेमात होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जुलै रोजी सकाळी एका व्यक्तीला थेऊर येथील यशवंत सहकारी कारखान्याच्या पडीक जागेत एका अनोळखी महिलेचा मृतदेह मिळून आला होता. प्रथमदर्शी डोक्यात दगड घालून खून केल्याचे दिसून येते होते. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून दिला होता. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. मात्र महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना यश येत नव्हते.

तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांना खून झालेल्या तरुणीच्या आईची माहिती मिळाली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी मुलगी दोन चार दिवसापासून बेपत्ता असल्याचे सांगितले. त्यांना ससून रुग्णालयात आणून मुलीचा मृतदेह दाखवला असता, त्यांनी ही आपलीच मुलगी असल्याचे सांगितले. चौकशीदरम्यान तिचे आरोपी चौगुले याच्यासोबत प्रेमसंबध असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी चौगुले याला तळेगाव दाभाडे परिसरातुन ताब्यात घेतले. सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चारित्र्याच्या संशयातून वैशालीचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे सांगितले.

शनिवारी पहाटे एक वाजता चौगुले याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालायाने त्याला 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीने खून केल्यानंतर कोणताही पुरावा पाठीमागे न ठेवता पसार झाला होता. त्यामुळे अतिशय कौशल्यपुर्वक तपास करून लोणीकाळभोर पोलिसांनी तरुणीची ओळख पटवत आरोपीला बेड्या ठोकल्या. ही कामगिरी उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक अमित गोरे, कर्मचारी राजेश दराडे, गणेश भापकर, निखील पवार, मल्हारी ढमढेरे यांच्या पथकाने केली.

असा काढला काटा

आरोपी महेश चौगुले आणि खून झालेली तरुणी वैशाली दुधावले हे दोघे मुळचे एकाच गावातील आहेत. पाच ते सहा महिन्यापासून दोघे एमेकांच्या प्रेमात होते. काही दिवस दोघे एकत्र देखील राहिले आहेत. दोघेजण दुचाकीवरू आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील मुळ गावी निघाले होते. त्यावेळी वैशाली हिच्या आईचे सतत फोन येत असल्यामुळे ते परत घरी निघाले होते. दरम्यान थेऊर परिसरात दोघांचे चारित्र्याच्या संशयातून भांडण झाले. त्याने मोठा दगड उचलून वैशालीच्या डोक्यात घातला. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर महेश हा फरार झाला होता. दोन दिवस तो शहरात फिरला आणि त्यानंतर हॉटेलवर गेला होता. आपण काही केलेच नाही असे तो वावरत होता.

असा लागला छडा..

खून झालेल्या तरुणीची ओळख पटलेली नव्हती. पोलिस सर्व शक्यता गृहीत धरून तपास करत होते. तांत्रिक विश्लेषणाद्वारे खून झालेल्या दिवशी त्या परिसरात सुरू असलेल्या मोबाईलची माहिती पोलिसांनी काढली. त्यातील एक मोबाईल काही वेळापासून बंद असल्याचे निदर्शनास आले. त्या मोबाईलवर अनेकदा कॉल आले होते. त्या क्रमांकावर पोलिसांनी संपर्क केला तेव्हा तो मोबाईल वैशाली हिच्या आईचा असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी संपर्क करून चौकशी केली. तेव्हा वैशालीचा खून झाल्याचे समोर आले.

चारित्र्याच्या संशयातून प्रियकरानेच आपल्या प्रेयसीचा डोक्यात दगड घालून खून केला. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने खूनाची कबुली दिली आहे.

– राजेंद्र मोकाशी वरिष्ठ पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news