

पनवेल: कोंडीची वाडी येथील नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या १६ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (३० जुलै) सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अभिषेक एलिया ढालवाणी (रा. अय्यप्पा मंदिरामागे, सुकापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
अभिषेक ढालवाणी हा आपल्या चार मित्रांसह वाजेगावजवळील बाबदेववाडी-कोंडीची वाडी ओव्हरब्रिजखालील नदीपात्र परिसरात फिरण्यासाठी गेला होता. त्यानंतर सर्व मित्रांनी नदीत पोहण्यासाठी उतरण्याचा निर्णय घेतला.
मात्र अभिषेकला पोहता येत नसतानाही तो पाण्यात उतरला. त्यावेळी त्याचा पाय घसरून तो खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. त्याच्या चारही मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधमोहीम राबवून अभिषेकला नदीपात्रातून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
या दुर्दैवी घटनेमुळे सुकापूर परिसरात शोककळा पसरली असून, पावसाळ्यात नदी, तलाव आणि धरण परिसरात पोहताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.