Alibag Newborn Death Case: नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी डॉ. प्रियल शेंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

गुन्हा दाखल होऊनही अद्याप आरोपी डॉक्टरांना अटक झालेली नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Alibag Newborn Death Case
Alibag Newborn Death CasePudhari
Published on
Updated on

अलिबाग: अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील २०२२ मधील नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी तब्बल चार वर्षांनंतर महत्त्वाची घडामोड घडली आहे. सर जे. जे. समूह रुग्णालय, मुंबई येथील पाच वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने सादर केलेल्या अहवालात तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियल रविंद्र शेंडे यांना कर्तव्यात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या अहवालाच्या आधारे अलिबाग पोलिसांनी डॉ. शेंडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता/पूर्वीचे भारतीय दंड संहिता कलम ३०४-अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही अद्याप आरोपी डॉक्टरांना अटक झालेली नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Alibag Newborn Death Case
Murud Fishing: मासेमारीसाठी मुरुडच्या कोळीबांधवांची सुरू झाली लगबग

बेलोशी (ता. अलिबाग) येथील सुष्मिता रुपेश काटले या १४ मे २०२२ रोजी प्रसूतीसाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. फिर्यादीनुसार, प्रसूतीच्या वेळी ऑन-ड्युटी असलेल्या डॉ. प्रियल शेंडे या रुग्णालयात उपस्थित नव्हत्या. वारंवार संपर्क करूनही त्या रुग्णालयात न आल्याने वेळेत आवश्यक उपचार आणि सिझेरियन शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. परिणामी, प्रसूतीदरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर अलिबाग पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, पीडित महिलेच्या तक्रारीनंतर उपचारासंबंधीची कागदपत्रे सर जे. जे. रुग्णालयातील तज्ज्ञ समितीकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आली होती.

२७ जुलै २०२६ रोजी प्राप्त झालेल्या अहवालात डॉ. शेंडे या कर्तव्यावर असताना जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिल्याने आवश्यक उपचार वेळेत मिळाले नाहीत आणि त्याचा परिणाम नवजात बालकाच्या मृत्यूत झाल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Alibag Newborn Death Case
Fishing Ban Demand: समुद्रातील मासेमारी १५ ऑगस्टपर्यंत बंद ठेवा; मच्छीमार कृती समितीची मागणी

या अहवालाच्या आधारे अलिबाग पोलीस ठाण्यात डॉ. प्रियल शेंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित सुष्मिता काटले यांनी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अलिबाग पोलिसांचे, रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल तसेच जे. जे. रुग्णालयातील तज्ज्ञ समितीचे आभार मानले. मात्र, "गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपी डॉक्टरांना अद्याप अटक का करण्यात आलेली नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जन्माच्या अगोदरच कित्येक कोवळ्या जिवांना डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत, सर्व सामान्यांच्या बालकांच्या जीवाला किंमत आहे की नाही?सरकारने या विषयाची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.

- अँड राकेश नारायण पाटील, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news