

अलिबाग ः रायगडातील 10 नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शने करत नगराघ्यक्षपदांसहनगरसेवक पदांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. शनिवारी एकूण 95 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. आतापर्यंत जिल्हाभरातून 140 सदस्य पदांसाठी अर्ज जमा झाले आहेत. तसेच नगराध्यक्ष पदासाठी आतापर्यंत 13 अर्ज सादर करण्यात आले आहेत.
ही आकडेवारी निवडणूक विभागाच्या दैनंदिन अहवालातून समोर आली आहे.दरम्यान,राज्य निवडणूूक आयोगाने रविवारीही (16 नोव्हेंबर) अर्ज भरण्यास सुचित केलेले आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सकाळी 11 ते 3 या काळात हे अर्ज सादर करण्याची वेळ आहे.सोमवारी अर्ज भरण्याचाअखेरचा दिवस आहे.
प्रामुख्याने अलिबागमधून शेकाप,काँग्रेस आघाडी,मुरुडमध्ये राष्ट्रवादी (अप) तर उरणमधून महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले.यावेळी आम्हीच विजयी होऊ,असा दावाही या पक्षांच्या नेत्यांसह उमेदवारांनी केला आहे. रायगडातील अलिबाग, पेण, उरण, कर्जत, खोपोली, माथेरान, रोहा, श्रीवर्धन, मुरुड, महाड या दहा नगरपालिकांसाठी 2 डिसेंबरला मतदान होत आहे.यासाठी 10 ते 17 नोव्हेंबर अर्ज भरण्याची मुदत आहे.
शनिवारी एकादशीचा मुहूर्त साधत अलिबागमध्ये शेकाप,काँग्रेस आघाडीच्या अक्षया प्रशांत नाईक,मुरुडमध्ये राष्ट्रवादी (अप) तर्फे आराधना मंगेश दांडेकर,उरणमध्ये महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीच्या (शप) भावना घाणेकर यांनी समर्थकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज सादर केले. आता रविवारी महाडमध्ये राष्ट्रवादी, भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.
खोपोलीमध्ये नगराध्यक्षपद उमेदवाराचा तिढा सोडविण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे.डॉ.सुनील तटकरे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली आहे. अलिबाग नगरपरिषदेसाठी आज 21 अर्ज दाखल झाले असून, यामुळे येथे सदस्य पदासाठी आलेल्या एकूण अर्जांची संख्या 21 इतकी झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी आज 1 अर्ज दाखल झाला असून एकूण 1 अर्ज प्राप्त आहे. उरण नगरपरिषदेत 26 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली असून आतापर्यंत 50 सदस्य पदांसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी आतापर्यंत 7 उमेदवारी अर्ज जमा झाले. मुरुड-जंजिरा नगरपरिषदेतही जोरदार प्रतिसाद नोंदवला गेला. 19 अर्ज दाखल झाले असून, एकूण अर्जांची संख्या 27 झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी 1 अर्ज दाखल झाला असून एकूण 1 अर्ज मिळाला आहे.
खोपोली नगरपरिषदेत आज 11 अर्ज दाखल झाले असून, एकूण अर्जांची संख्या 16 इतकी झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी आज 2 व एकूण 3 अर्ज तयार झाले आहेत. पेण नगरपरिषदेत आज 15 अर्ज दाखल झाले असून एकूण अर्जांची संख्या 21 झाली आहे. महाड नगरपरिषदेत आज 1 अर्ज दाखल झाला असून नगराध्यक्ष पदासाठीही 1 अर्ज जमा झाला आहे.