

मुंबई ः नरेश कदम/राजेश सावंत
मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे, अशी अधिकृत घोषणा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी केली. परिणामी, महाविकास आघाडी मुंबईत फुटली असून, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे हे तिघेच आघाडीत उरले आहेत. याचा अर्थ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध काँग्रेस अशी तिरंगी लढत मुंबईत पाहायला मिळेल.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे बंधूंच्या नादी न लागता स्वबळावर मुंबई महापालिका लढवा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे आणि मुंबई काँग्रेसचेही नेते करत होते. त्यात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सर्वांत आघाडीवर होते. त्यातूनच मुंबई काँग्रेसच्यावतीने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी, असा प्रस्ताव काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात आला होता. त्याला पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखविला असल्याचे चेन्नीथला यांनी जाहीर केले.
हुकुमशाही असलेल्या पक्षांसोबत आघाडी करण्याचा प्रश्नच नाही. मुंबई ही सगळ्यांची आहे. परप्रांतियाना मारहाण करणे हे काँग्रेसला मान्य नाही. सगळयांना सोबत घेवून जाण्याची काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे काँग्रेस मुंबई महापालिकेत स्वबळावर लढेल, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्यांचा रोख परप्रांतीयांना मारझोड करणाऱ्या मनसेकडे होता.
काँग्रेसचाच महापौर : थोरात
मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याची नेते आणि कार्यकर्ते यांची मागणी होती. त्याप्रमाणे निर्णय झाला आहे. काँग्रेसचा मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा महापौर बसेल, असा निर्धार काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळेल, असे मत आमदार अस्लम शेख यांनी मांडले.
आघाडीसाठी धोका
मुंबई शहरात गेल्या काही वर्षात काँग्रेसचा प्रभाव कमी झाला आहे. त्यात आता मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेसचे मुंबईतील उरले सुरलेले अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता असून, काँग्रेसच्या स्वबळामुळे महाविकास आघाडीलाही धोका निर्माण झाला आहे.
मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसचे संख्याबळ 30 ते 40 दरम्यान राहिले आहे. या आधीच्या म्हणजे 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे 31 नगरसेवक निवडून आले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत नसताना धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होईल. त्यातून आपल्या किती जागा काँग्रेस राखते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
विधानसभा व लोकसभा निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसचे अस्तित्व काही प्रमाणात टिकले. तर काँग्रेसमुळे महाविकास आघाडीलाही फायदा झाला. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सामील न होणे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे ही मोठे नुकसान आहे.
दुसरीकडे हे स्वबळ म्हणजे खुद्द काँग्रेससाठीही धोक्याची घंटा आहे. काँग्रेसला मतदान करणारे बहुतांश मुस्लिम मतदार असून काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवल्यास हे मतदार आघाडीपासून दुरावले जाण्याची शक्यता आहे. केवळ मुस्लिम मतदारांवर काँग्रेसला निवडून येणे शक्य नाही. तर दुसरीकडे मुस्लिम मतदार काँग्रेसकडे वळल्यास याचा फायदा भाजपा-शिवसेना महायुतीला होऊ शकतो. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढवणे म्हणजे काँग्रेससाठी मुंबई शहरातील राजकीय भवितव्य धोक्यात येण्यासारखेच आहे.
काँग्रेसचा प्रभाव असलेले प्रभाग
मालवणी, जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पश्चिम, कुर्ला, अणुशक्तीनगर, मानखूर्द, गोवंडी, शिवाजीनगर, नागपाडा, भेंडीबाजार, महोम्मद अली रोड, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम, धारावी याशिवाय कुर्ला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड जिंकल्या त्या महाविकास आघाडीच्या पाठिंब्यानेच.
पवारांचा अंदाज खरा ठरला
मुंबईत काँग्रेस स्वबळावर उतरणार असल्याची कुणकुण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आधीच लागली होती. शनिवारी दुपारीच बारामतीत बोलताना मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढेल की नाही, याची माहिती नाही; पण त्यांनी तसा निर्णय घेतल्यास आश्चर्य नाही, असे शरद पवार म्हणाले हेोते. त्यांचा अंदाज खरा ठरला. मुंबईचा महापौर हा युतीचाच होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच म्हणाले, याबाबत पवार यांना विचारले असता, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज ठाकरेंना आघाडीत घेण्यावरून कॉंग्रेसने टोकाची भूमिका घेऊ नये, असा सल्ला शरद पवार यांनी अलीकडेच दिला होता. मात्र, काँग्रेस श्रेष्ठींनी तो ऐकला नाही आणि आपल्या प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे योग्य ठरवले, असेच चेन्नीथला यांच्या घोषणेवरून स्पष्ट झालेआहे.
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आघाडीतून बाहेर
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी युतीची हाक देताच उद्धव ठाकरे यांनीही भाऊबंदकी सोडली. या ठाकरे बंधूंची युती अद्याप जाहीर झाली नसली तरी त्यांच्या युतीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही पसंती दिली. दोन्ही ठाकरे आणि शरद पवार एकत्र येत असताना राज ठाकरेंच्या आघाडीतील प्रवेशाला विरोध करत काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा मार्ग पत्करल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.